Sheikh Hasina has resigned as Bangladesh Prime Minister : बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. हसीना यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मुख्य मागणी होती.
शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाची दुसरी कारकिर्द 2009 साली सुरु झाली होती. त्या राजधानी ढाकामधून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं भारतामधील सुरक्षित स्थळी दाखल झाल्या असल्याची शक्यता आहे, अशी माहिती रॉयटर या न्यूज एजन्सीनं दिली आहे.
'आम्ही सरकार चालवणार'
बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी हिंसाचार गेल्या महिन्यात सुरु झाला. त्या हिंसाचाराला गेल्या काही दिवसामध्ये 'शेख हसीना हटाव'चं स्वरुप आलं होतं. हसीना यांनी अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार-उज-जमान यांनी पत्रकार परिषद घेतली.
जमान यांनी सांगितलं की, 'तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करु. आम्ही देशात शांतता परत आणू. आम्ही या देशात अंतरिम सरकार चालवू. तोडफोड आणि जाळपाळोपासून दूर रहा. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर परिस्थिती सुधारेल. हिंसाचार आणि मारहाणीतून काहीही साध्य होणार नाही. अराजकतेपासून दूर राहा.'
( नक्की वाचा : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 'ढाका पॅलेस' सोडलं, PM निवासात आंदोलक घुसले )
45 मिनिटांचा कालावधी
शेख हसीना आणि त्यांच्या लहाण बहिणीनं वाढता विरोध लक्षात घेऊन पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हसीना यांना पद सोडण्यासाठी लष्करानं फक्त 45 मिनिटांचा कालावधी दिला होता.
शेख हसीना यांना देश सोडण्यापूर्वी देशवासियांना संबोधन करण्याची इच्छा होती. पण, त्यांना ती परवानगी देखील देण्यात आली नाही. बांगलादेश लष्करानं सर्व कारभार हाती घेतल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
देशभरात संचारबंदी
बांगलादेश सरकारनं हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालय आणि बाजारपेठांना 3 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. देशात सुरु असलेल्या हिंसाचारामुळे अनेक रेल्वे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाही करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
कापड उद्योगालाही कुलूप लावण्यात आलंय. लोकांनी जास्तीत जास्त कळ घरामध्ये राहावं, असं आवाहान पोलिसांनी केलंय. BBC च्या रिपोर्टनुसार सोमवारी सकाळी 11 वाजता देशभरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पण, काही वेळानंच पुन्हा इंटरनेट सुरु करण्यात आलं.