जाहिरात

पाळीव कुत्र्याने प्रेमाने चाटलं अन् महिलेने गमावले हात-पाय; उपचारादरम्यान 6 वेळा हृदयविकाराचा झटका

एका पाळीव कुत्र्याने फक्त प्रेमाने चाटल्यामुळे त्यांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले आहेत.

पाळीव कुत्र्याने प्रेमाने चाटलं अन् महिलेने गमावले हात-पाय; उपचारादरम्यान 6 वेळा हृदयविकाराचा झटका

आपण आपल्या पाळीव कुत्र्यांना कुटुंबाचा भाग मानतो आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. मात्र, ब्रिटनमधील ५२ वर्षीय मंजीत संघा यांच्यासाठी कुत्र्याचे हेच प्रेम जीवावर बेतलं. एका पाळीव कुत्र्याने फक्त प्रेमाने चाटल्यामुळे त्यांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले आहेत.

नेमकं घटना काय?

जुलै २०२५ मध्ये मंजीत कामावरून घरी परतल्या. तेव्हा त्यांना थोडी अस्वस्थता जाणवू लागली. त्यांना वाटलं की, हा कामाचा थकवा असेल. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडली. त्यांचे शरीर थंड पडले, ओठ निळे झाले आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी दिलेली माहिती धक्कादायक होती. मंजीत यांना 'सेप्सिस' नावाचा अतिशय धोकादायक संसर्ग झाला होता.

उपचारादरम्यान ६ वेळा हृदयविकाराचा झटका

मंजीत यांची प्रकृती इतकी खालावली होती की, उपचारादरम्यान त्यांना ६ वेळा हृदयविकाराचा झटका आला. हा संसर्ग त्यांच्या संपूर्ण शरीरात पसरला होता. त्यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना अखेर त्यांचे दोन्ही हात आणि गुडघ्यापासून खालचे दोन्ही पाय कापण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला.

नक्की वाचा - Mumbai News: ब्रिटिशांची एक घोषणा.. कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल; 1832 मध्ये काय घडलेलं?

लाळेमध्ये दडलेला धोकादायक बॅक्टेरिया

आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुत्र्याने मंजीत यांना चावा घेतला नव्हता. त्यांच्या शरीरावर एक छोटीशी जखम किंवा ओरखडा होता, ज्याला त्यांच्या कुत्र्याने प्रेमाने चाटले होते. डॉक्टरांच्या मते, कुत्र्यांच्या लाळेमध्ये 'कॅपनोसायटोफेगा कॅनिमोरसस' नावाचा बॅक्टेरिया असतो. हा बॅक्टेरिया सामान्यतः कुत्र्यांसाठी हानिकारक नसतो, पण जर तो मानवी रक्तामध्ये जखमेद्वारे मिसळला, तर 'सेप्सिस' होऊ शकतो. सेप्सिसमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करू लागते, ज्यामुळे अवयव निकामी होतात.

काय काळजी घ्यावी?

ही घटना आपल्याला भीती घालण्यासाठी नसून जागरूक करण्यासाठी आहे. जर तुमच्याकडे पाळीव प्राणी असतील तर खालील गोष्टी लक्षात ठेवा...

१. पाळीव प्राण्यांना तुमच्या शरीरावरील कोणत्याही जखमेला किंवा ओरखड्याला चाटू देऊ नका.
२. जर शरीरावर छोटी जखम असेल, तर ती लगेच स्वच्छ करून पट्टीने झाकून ठेवा.
३. प्राण्यांच्या संपर्कात आल्यानंतर अचानक ताप, थंडी वाजणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

मंजीत संघा यांची ही कहाणी पाळीव प्राणी पाळणाऱ्यांसाठी एक मोठा धडा आहे. सतर्कता आणि योग्य काळजी घेतल्यास असे गंभीर धोके टाळता येऊ शकतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com