China News: चीनमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केलेल्या दोन माजी संरक्षण मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वी फेंघे आणि ली शांगफू अशी या दोन बड्या नेत्यांची नावे आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत या दोन्ही नेत्यांना कठोर शासन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे चीनच्या लष्करी आणि राजकीय वर्तुळात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
काय आहे कारण?
चीनमधील लष्करी न्यायालयाने वी फेंघे आणि ली शांगफू यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वी फेंघे यांच्यावर लाच घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, तर ली शांगफू यांना लाच घेण्यासोबतच लाच दिल्याबद्दलही दोषी मानण्यात आले आहे.
हे दोन्ही नेते शी जिनपिंग यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. वी फेंघे यांनी 2018 ते 2023 या काळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते, तर शांगफू यांनी त्यानंतर काही काळ हे पद सांभाळले होते. 2024 मध्येच या दोघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
दोन वर्षांची सवलत आणि....
न्यायालयाने दोन्ही नेत्यांना दोन वर्षांच्या सवलतीसह मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. याचा अर्थ असा की, दोन वर्षांनंतर त्यांच्या वर्तणुकीचा आढावा घेऊन या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले जाईल.
मात्र, ही जन्मठेप अत्यंत कठोर असेल. त्यांना कोणत्याही परिस्थितीत पॅरोल किंवा शिक्षेत सवलत मिळणार नाही. यासोबतच त्यांचे सर्व राजकीय अधिकार काढून घेण्यात आले असून त्यांची संपूर्ण खासगी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
( नक्की वाचा : Kohinoor Diamond: 'कोहिनूर' भारताला परत का मिळत नाही? कायदा नाही तर 'हे' आहे हिरा न देण्याचं ब्रिटनचं खरं कारण )
विश्वासघातकी म्हणून शिक्कामोर्तब
वी फेंघे यांच्यावर करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांना अधिकृतपणे विश्वासघातकी आणि पावित्र्य गमावलेला नेता असे संबोधण्यात आले आहे. पक्षाने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला नाही आणि त्यांच्या कृतीमुळे सशस्त्र दलातील राजकीय वातावरण दूषित झाले, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
लष्करी विकास आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला यामुळे मोठे नुकसान पोहोचले आहे, असेही अभियोगात नमूद करण्यात आले आहे. वी फेंघे हे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या अत्यंत महत्त्वाच्या रॉकेट फोर्सचे नेतृत्व करत होते आणि त्यांची निवड स्वतः शी जिनपिंग यांनी केली होती.
चीनमधील फाशीच्या शिक्षेचे भयानक वास्तव
सर्वाधिक मृत्यूदंडाच्या शिक्षा चीनमध्ये दिल्या जातात. उपलब्ध आकडेवारीनुसार, चीनने 2002 मध्ये 12000, 2007 मध्ये 6500 आणि 2013-2014 या काळात दरवर्षी सरासरी 2400 लोकांना फाशी दिली आहे. 2009-2010 च्या दरम्यान जगभरात झालेल्या एकूण फाशीच्या शिक्षांपैकी एकट्या चीनचा वाटा 58 ते 65 टक्के इतका मोठा होता.
धक्कादायक बाब म्हणजे, सरकारी आकडेवारी आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये मोठी तफावत असते. 2014-2016 दरम्यान माध्यमांनी 931 फाशीच्या बातम्या दिल्या होत्या, मात्र सरकारी रेकॉर्डमध्ये केवळ 85 केसेसची नोंद आढळली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या शिक्षांची स्वतंत्र आकडेवारी चीन कधीही उघड करत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world