Covid-19 outbreak in Asia : एकविसाव्या शतकातील महाआपत्तीमध्ये कोरोना व्हायरसचा (coronavirus) समावेश आहे. चीनमधील वुहान शहरातील नागरिकांना सर्वप्रथम या व्हायरसची लागण झाली. त्यानंतर पाहाता-पाहता संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं. जगातील प्रत्येक देशाला कोरोनाचा फटका बसला. कोरोनामुळे मनुष्यहानीसह आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले. कोरोनाच्या त्रासदायक आठवणी ताज्या असतानाच एक टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आशिया खंडात पुन्हा एकदा कोरोनाची भीती वाढू लागली आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोव्हिड-19 च्या नवीन केसेसमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांमध्येच या दोन्ही ठिकाणी कोरोनोच्या रुग्णांची संख्या अचानक वाढलीय. त्याला कोरोनाची नवी लाट मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाँगकाँगमध्ये या विषाणूच्या संसर्गाचा दर खूप वाढला आहे. तर सिंगापूरमध्येही या विषाणूच्या विळख्यात येणाऱ्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे.
हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी सांगितले की, 'शहरात कोरोनाबाधित लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. सेंटरच्या आकडेवारीनुसार, मे मध्ये आतापर्यंत जेवढी प्रकरणे समोर आली आहेत, ती गेल्या एका वर्षातील सर्वाधिक आहेत.
( नक्की वाचा : भारतासोबत फक्त 18 मे पर्यंत शस्त्रसंधी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य! )
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानेही वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'गेल्या काही आठवड्यांत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 28 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. स्थानिक रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.ट
चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यातील उच्चांकाप्रमाणे कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. 4 मे पर्यंतच्या पाच आठवड्यांत मुख्य भागातील हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर दुप्पट झाला आहे.
दरम्यान, थायलंडच्या रोग नियंत्रण विभागाने यावर्षी दोन समूह संसर्गाची नोंद केली आहे. एप्रिलमधील वार्षिक सोंगक्रान उत्सवानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या उत्सावात मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. त्यामुळे थायलंडमधील आरोग्य यंत्रणा देखील अलर्टवर आहे.