- मैला चक्रीवादळ सध्या १९५ किलोमीटर वेगाने सरकत असून गेल्या ७५ वर्षांतील सर्वात भयंकर वादळ मानले जाते
- या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने सोलोमन समुद्रात १९५१ नंतर सर्वात तीव्र रूप धारण केले आहे
- पुढील २४ तासांत वादळ पापुआ न्यू गिनी ओलांडून ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे
Cyclone Maila: 'मैला' चक्रीवादळाची भीती निर्माण झाली आहे. हे महाभयंकर चक्रीवादळ सध्या 195 किमी वेगाने पुढे सरकत आहे. विशेष म्हणजे गेल्या 75 वर्षांतलं हे सर्वात मोठं चक्रीवादळ असल्याचं सांगितलं जात आहे. सोलोमन समुद्रात निर्माण झालेले 'मैला' (Maila) हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ आता ऑस्ट्रेलियाच्या दिशेने सरकत आहे. ताशी 195 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांमुळे या वादळाने रौद्र रूप धारण केले आहे. 1951 नंतर सोलोमन समुद्रात निर्माण झालेले हे सर्वात भीषण वादळ ठरले आहे. पुढील 24 तासांत हे वादळ पापुआ न्यू गिनी ओलांडून रविवारी ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 1951 मध्ये नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून सोलोमन समुद्रात इतके शक्तिशाली वादळ कधीही दिसले नव्हते. कॅनडाच्या 'द वेदर नेटवर्क'ने दिलेल्या माहितीनुसार, या भागात सहसा चक्रीवादळांसाठी पोषक वातावरण नसते, तरीही समुद्रपृष्ठभागाच्या वाढत्या तापमानामुळे या वादळाची तीव्रता वाढली आहे. 'मैला' चक्रीवादळाने काही दिवसांपूर्वी श्रेणी-5 (Category-5) चा टप्पा गाठला होता. या वादळानंतर सर्वानाच सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शिवाय ऑस्ट्रेलियात खास काळजी घेतली जात आहे.
'एबीसी' (ABC) न्यूजच्या वृत्तानुसार, या वादळाचा तडाखा सोलोमन बेटे आणि बोगेनविले येथील किनारपट्टीच्या भागांना बसला आहे. येथे अनेक रस्ते आणि इमारतींचे नुकसान झाले असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलोमन बेटांच्या पश्चिम प्रांतात मोठे नुकसान झाले असून घरांची पडझड झाली आहे. या भागात बचाव कार्य ही सुरू करण्यात आले आहे. लोकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांना ही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. प्रशासन ही बचाव कार्यात उतरलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ब्यूरो ऑफ मीटरोलॉजीने (BOM) 10 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, सध्या हे वादळ श्रेणी-2 मध्ये असून त्याचा वेग ताशी 110 ते 155 किलोमीटर दरम्यान आहे. मात्र, रविवारी हे वादळ उत्तर क्वीन्सलँडच्या दिशेने सरकणार असून पुढील आठवड्यात केप यॉर्क द्वीपकल्पाला ओलांडण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ ताशी 7 किलोमीटरच्या धिम्या गतीने पश्चिमेकडे सरकत आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियात सर्वांनाच सतर्क राहण्यास सांगितले आहे. शिवाय सुरक्षेच्या उपाय योजना ही सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world