डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शपथग्रहणाच्या दोन तास आधी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांच्या बरोबर पत्नी मेलानिया ट्रम्प होत्या. त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये मावळते राष्ट्रपती जो बाईडेन आणि जिल बाईडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले. बाईडेन आणि डोनाल्ड ट्रम्प हे राजकारणातील एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोमवारी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात करतील. त्यासाठी आयोजित शपथग्रहण सोहळा हा यंदा कॅपिटलच्या अंतर्गत सभागृहात होणार आहे. साधारणपणे शपथविधी सोहळा हा कॅपिटलसमोरच्या प्रांगणात करण्याची अमेरिकन परंपरा आहे. या सोहळ्याला सर्वसाधारण नागरिकही उपस्थित राहू शकतात. मात्र यंदा आर्टिक्ट वादळामुळे बर्फवृष्टीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे यंदाचा शपथविधी सोहळा हा सभागृहात होणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण अमेरिकन नागरिकांना हा सोहळा प्रत्यक्षात पाहता येणार नाही.
याआधी 1985 मध्ये राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांचा शपथविधी सोहळाही कॅपिटलच्या सभागृहात घेण्यात आला होता. रोटुंडामध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. प्रतिकूल वातावरणात शपथविधी सोहळा झाला नाही तर रोटुंडा ही पर्यायी जागा आहे. दरम्यान या सोहळ्यासाठी पहिल्यांदाच परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. याआधी इतर देशांच्या प्रतिनिधींना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण नसायचं. भारताकडून यंदा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 20 जानेवारीला अमेरिकन वेळेनुसार दुपारी 12 वाजता ट्रम्प अध्यक्षपदाची शपथ घेतील. भारतीय वेळेनुसार हा सोहळा रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी पार पडेल.
अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश डॉन रॉबर्टस हे ट्रम्प यांना शपथ देतील. ट्रम्प आपली पत्नी आणि पहिल्या महिला मेलेनिया ट्रम्प यांच्या साथीनं शपथ घेतील. कॅपिटल रोटुंडामध्ये यंदा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीनंतर ट्रम्प हे आपलं पहिलं अध्यक्षीय भाषण करतील. आपलं पहिलं अध्यक्षीय भाषण हे 2017 मधील भाषणापेक्षा वेगळं असेल असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. हे भाषण नागरिकांना एकत्रित आणणारं आणि प्रोत्साहन देणारं असेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
तर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे देखील या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. परंपरेनुसार ते ट्रम्प यांच्याकडे सत्तांतरण करतानाचे साक्षिदार असतील. चार वर्षांपूर्वी निवडणुकीतील पराजयानंतर ट्रम्प यांनी मात्र बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला होता. यंदा इतर ही देशांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.या शपथविधी सोहळ्याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहेत.