Why Donald Trump upset over India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणांमुळे दोन्ही देशांमधील संबंध सध्या ताणले गेले आहेत. ट्रम्प भारतावर नाराज असल्यानंच त्यांनी टॅरिफबाबत कठोर निर्णय घेतला असल्याचं मानलं जात आहे. कॅनडामधील भारताचे माजी राजदूत विकास स्वरुप यांनी ट्रम्प यांच्या नाराजीचं नेमकं कारण सांगितलं आहे.
विकास स्वरुप यांनी सांगितलं की, 'मे महिन्यात झालेल्या सैनिकी संघर्षानंतर पाकिस्तानसोबतच्या शांतता करारात त्यांच्या तथाकथित भूमिकेकडे दुर्लक्ष केल्याने डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज आहेत. पाकिस्तानसोबतच्या अमेरिकेच्या सध्याच्या संबंधांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक हितांनी प्रेरित केलेली एक अल्पकालीन व्यवस्था आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर भारत-अमेरिका संबंध हे धोरणात्मक राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ANI या वृत्तसंस्थेशी एका मुलाखतीत, स्वरूप यांनी व्यवसायिक चर्चेत ट्रम्प प्रशासनाच्या दबावाखाली न येण्याच्या नवी दिल्लीच्या निर्णयाचे कौतुक केले आणि सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ शेवटी अमेरिकेमध्ये महागाई वाढवतील.
( नक्की वाचा : Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर )
त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले की, आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की हे टॅरिफ का लावले गेले आहेत. एक कारण हे आहे की ट्रम्प भारतावर खुश नाहीत. ते यासाठी खुश नाहीत, कारण भारत BRICS चा सदस्य आहे. त्यांना असे वाटते की BRICS हा अमेरिका विरोधी देशांचा समुह आहे. हा समुह भविष्यात अमेरिकेच्या डॉलरला आव्हान देऊ शकतो. भारतानं BRICS चा सदस्य नसावे, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे.
स्वरूप यांच्या मते, याचे दुसरे कारण मे मध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत शांतता करार करण्यासाठी ट्रम्प यांना श्रेय देण्यास भारताने नकार दिला आहे. अमेरिकेने युद्धबंदीच्या चर्चेत कोणतीही भूमिका बजावली नाही, असं भारतानं सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं आहे. कारण भारत तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप स्वीकारत नाही. पाकिस्तानच्या सैन्य संचालन महासंचालकांच्या विनंतीवर दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांच्या दरम्यान थेटपणे संघर्षविरामाची मध्यस्थता करण्यात आली होती.
( नक्की वाचा : Independence Day Speech: स्वातंत्र्यदिनी शाळेत भाषण करण्यासाठी लक्षात ठेवा 10 मुद्दे, सर्व करतील तुमचं कौतुक )
त्यांनी पुढे सांगितले की, ट्रम्प यांनी आतापर्यंत जवळपास 30 वेळा सांगितले आहे की तेच होते ज्यांनी दोन्ही देशांना काठावरून परत आणले, ज्यांनी उपखंडातील अणुस्फोट थांबवला. त्यामुळे, ते या गोष्टीमुळे नाराज आहेत की भारताने त्यांच्या भूमिकेचा स्वीकार केला नाही, तर पाकिस्तानने केवळ त्यांच्या भूमिकेचा स्वीकार केला नाही, तर त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित देखील केले आहे.