जाहिरात

Sergio Gor : ट्रम्प यांच्या खास दूताची दिल्लीत नियुक्ती, भारत-अमेरिका संबंधांना मिळणार ‘बूस्टर डोस’?

US Envoy to India : अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव वाढत असताना, डोनाल्ड ट्रम्प त्यांचे सर्वात जवळचे सहकारी सर्जियो गोर यांना भारतात पाठवण्याची तयारी करत आहेत.

Sergio Gor : ट्रम्प यांच्या खास दूताची दिल्लीत नियुक्ती, भारत-अमेरिका संबंधांना मिळणार ‘बूस्टर डोस’?
US Envoy to India : डोनाल्ड ट्रम्प यांचे खास दूत आता दिल्लीत येणार आहेत.
मुंबई:

US Envoy to India : अमेरिका आणि भारताच्या संबंधांमध्ये तणाव वाढत असताना, डोनाल्ड ट्रम्प त्यांचे सर्वात जवळचे सहकारी सर्जियो गोर यांना भारतात पाठवण्याची तयारी करत आहेत. व्हाइट हाऊसचे 'डायरेक्टर ऑफ प्रेसिडेंशियल पर्सनल' असलेल्या सर्जियो गोर यांची भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते आणि भारतात अमेरिकेचा कोणताही राजदूत नियुक्त नव्हता. आता ट्रम्प यांच्या या निर्णयाकडे अनेक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे . यामुळे भारत-अमेरिका संबंध पुन्हा एकदा रुळावर येऊ शकतात, असे मानले जात आहे. सर्जिओ गोर कोण आहेत? त्यांच्या नियुक्तीमागील ट्रम्प यांचा उद्देश काय आहे? हे समजून घेऊया

कोण आहेत सर्जियो गोर?

सर्जियो गोर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराच्या काळापासूनच त्यांच्यासोबत होते. ट्रम्प यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्यात गोर यांची महत्त्वाची भूमिका होती. याच कारणामुळे त्यांना ट्रम्प यांचे अत्यंत जवळचे मानले जाते. खुद्द ट्रम्प यांनीही ही गोष्ट सांगितली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी सर्जियो यांना 'व्हाइट हाऊसचे डायरेक्टर ऑफ प्रेसिडेंशियल पर्सनल' या पदावर नियुक्त केले होते.

( नक्की वाचा : Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा 'मुड स्विंग', भारतावरील टॅरिफबाबत केली मोठी घोषणा )
 

  • सर्जियो गोर यांचा जन्म उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झाला.
  • 12 वर्षांचे असताना, 1999 मध्ये ते आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत स्थलांतरित झाले.
  • त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले.
  • सर्जियो गोर यांनी अनेक रिपब्लिकन खासदारांसाठी प्रवक्ते म्हणून काम केले आणि नंतर ट्रम्प यांच्या टीममध्ये दाखल झाले. 

सर्जियो यांच्या भारतात येण्याचा अर्थ

सर्जियो गोर यांची राजदूत म्हणून भारतात येण्याची अनेक कारणे असू शकतात. 39 वर्षीय सर्जियो यांची नियुक्ती अशा वेळी होत आहे, जेव्हा भारतासोबत अमेरिकेचे संबंध एका कठीण टप्प्यातून जात आहेत. ट्रम्प यांनी भारतावर 50% शुल्क (tariff) लावले आहे, जे 27 ऑगस्टपासून लागू होईल.

काही तज्ज्ञांचे मत आहे की, अमेरिका एका बाजूला भारतावर शुल्क लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यांना भारतासोबत चांगले संवाद हवे आहेत, कारण भारतासोबतचे वाईट संबंध अमेरिकेवरही परिणाम करतील. याच कारणामुळे ट्रम्प त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याला दिल्लीत पाठवत आहेत.  या नियुक्तीला सिनेटची मंजुरी मिळाली, तर भारत-अमेरिकेमध्ये संवाद सुधारेल आणि अनेक गोष्टींबाबत लवचिक भूमिका घेतली जाऊ शकते.

भारत-चीन आणि रशियाची जवळीक कारण?

अमेरिकेच्या कठोर भूमिकेनंतर आणि भारताबद्दलच्या त्यांच्या सततच्या वक्तव्यानंतर भारताने आपल्या धोरणात बदल केला आहे. भारत आता चीनसोबतचे आपले संबंध संतुलित करत आहे, तसेच युरोपियन युनियन आणि रशियासोबतही व्यापाराबाबत चर्चा सुरू आहे. यामुळे ट्रम्प अस्वस्थ दिसत आहेत. असे मानले जाते की, ते भारताचा एक हात सोडल्यानंतर आता दुसरा हात पकडण्याची तयारी करत आहेत, कारण चीनचा सामना करण्यासाठी भारतच अमेरिकेचा सर्वात मोठा आधार आहे. याच कारणामुळे ते दिल्लीत त्यांच्या विश्वासू साथीदाराला बसवून भारताला एक मोठा संदेश देण्याची तयारी करत आहेत.

( नक्की वाचा : Trump Tariff : अमेरिकेच्या त्रासावर रशियाची गोळी, भारताला मिळाली खास ऑफर! अर्थव्यवस्थेचं टेन्शन होणार दूर )
 

पाकिस्तान फॅक्टर ही कारण

सर्जियो गोर केवळ भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून येणार नाहीत, तर त्यांना 'स्पेशल एनवॉय फॉर साउथ अँड सेंट्रल एशियन अफेयर्स' (दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार) ची जबाबदारीही सोपवली जात आहे. याच कारणामुळे काही लोक या नियुक्तीला पाकिस्तानच्या दृष्टिकोनातूनही पाहत आहेत.

सर्जियो गोर दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहार पाहणार असतील, तर ते पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांशीही संवाद साधतील. याचा अर्थ, अमेरिका आता भारत आणि पाकिस्तानला एकाच संदर्भात पाहण्याचे धोरण अवलंबवू शकते, जे भारतासाठी चिंतेची बाब ठरू शकते.

भारत-अमेरिका संबंधांमध्ये कटुता का?

भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीत गेल्या काही महिन्यांमध्ये बरेच बदल झाले आहेत.  गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका हे दोन देश परस्परांच्या जवळ आले होते. दोन्ही देश अनेक गोष्टींवर सहमत होते, तिथे आता याच्या अगदी उलट अमेरिका आणि भारत एकमेकांसमोर उभे आहेत.

रशियासोबतचा व्यापार: भारताची इतर देशांशी, विशेषतः रशियासोबतची जवळीक आणि व्यापार यामुळेट्रम्प खूश नाहीत. त्यामुळेच ते भारताबाबत कठोर निर्णय घेत आहेत. रशियाकडून तेल खरेदी हा ट्रम्प यांनी मोठा मुद्दा बनवला आहे.

कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील करार: भारताने कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राबाबत अमेरिकेशी झालेल्या कराराला संमती दिली नाही, हे देखील ट्रम्प यांच्या नाराजीचे मोठे कारण आहे. अमेरिका आपल्या दुग्ध आणि कृषी उत्पादनांना भारतात आणण्याच्या तयारीत होता, पण भारत सरकारने शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या लोकांचे हित लक्षात घेऊन याला नकार दिला.

ब्रिक्स देशांना धमकी: भारत-अमेरिका संबंधांतील कटुतेचे एक कारण ब्रिक्सलाही (BRICS) मानले जाते. ब्रिक्समध्ये भारत, चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इराण, इथिओपिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. हे सर्व देश डॉलरवरील त्यांचं अवलंबित्व कमी करू इच्छितात, ज्यामुळे अमेरिकेचे नुकसान होईल. याच कारणामुळे ट्रम्प भारतासह इतर ब्रिक्स देशांना व्यापार पूर्णपणे बंद करण्याची धमकी देत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com