जाहिरात

El Mencho: मेक्सिकोचा 'पाब्लो एस्कोबार' मातीत मिसळला; एका गर्लफ्रेंडच्या चुकीने मोडले ड्रग्जचे साम्राज्य!

El Mencho Killed: . एका गर्लफ्रेंडच्या नादापायी या कुख्यात गुन्हेगाराचा पत्ता पोलिसांना लागला आणि कित्येक वर्षांपासून सुरू असलेला त्याचा लपाछपीचा खेळ संपला.

El Mencho: मेक्सिकोचा 'पाब्लो एस्कोबार' मातीत मिसळला; एका गर्लफ्रेंडच्या चुकीने मोडले ड्रग्जचे साम्राज्य!
El Mencho : जगातील सर्वात मोठा ड्रग्जचा डॉन अखेर ठार झाला आहे.
मुंबई:

El Mencho Killed: जगातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया मानला जाणारा अल् मेन्चो अखेर मारला गेला आहे. मेक्सिकोच्या सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केली असली, तरी या मोहिमेच्या यशामागे एक रंजक कारण समोर आले आहे. एका गर्लफ्रेंडच्या नादापायी या कुख्यात गुन्हेगाराचा पत्ता पोलिसांना लागला आणि कित्येक वर्षांपासून सुरू असलेला त्याचा लपाछपीचा खेळ संपला.

नेमेशियो ओसेगुएरा सर्व्हान्तेस उर्फ अल् मेन्चो हा मेक्सिकोतील सर्वात शक्तिशाली जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता. मेक्सिको आणि अमेरिका या दोन्ही देशांचे सुरक्षा दल गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या शोधात होते. मात्र, तो इतका सावध होता की त्याचा ठावठिकाणा शोधणे अशक्य झाले होते. अखेर त्याच्या एका प्रेयसीवर ठेवलेल्या पाळतीमुळे सुरक्षा दलांना यश आले.

गर्लफ्रेंडमुळे फुटला गुपित पत्ता

अल् मेन्चो आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी व्याकूळ होता. सुरक्षा दलांनी त्याच्या प्रेयसीच्या एका अत्यंत विश्वासू साथीदाराचा पाठलाग सुरू केला होता. हा साथीदार त्या महिलेला घेऊन जलिस्कोमधील टपालपा येथे पोहोचला. तिथे अल् मेन्चो आणि या महिलेची भेट होणार होती. 

अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीमुळे या लोकेशनवर शिक्कामोर्तब झाले. अल् मेन्चोने या महिलेसोबत रात्र घालवली आणि ती महिला तिथून निघताच मेक्सिकन स्पेशल फोर्सने त्यांचं जाळं पसरवलं.

( नक्की वाचा : Shocking News: 20 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेला बाप सापडला ड्रममध्ये; मुलाच्या 'त्या' कृतीने पोलिसही सुन्न )

जंगलात लपून बसला होता ड्रग्ज लॉर्ड

रविवारी पहाटेच्या सुमारास ही मोठी मोहीम राबवण्यात आली. लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला होता आणि आकाशात 6 हेलिकॉप्टर्स घिरट्या घालत होती. स्वतःला वाचवण्यासाठी अल् मेन्चोने आपल्या बॉडीगार्डसह जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला. 

त्याने झाडाझुडपांमध्ये लपून राहण्याचा प्रयत्न केला, पण स्पेशल फोर्सच्या जवानांनी त्याला शोधून काढले. यावेळी झालेल्या भीषण गोळीबारात अल् मेन्चो आणि त्याचे दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

( नक्की वाचा : Pune News: 'आमच्यात काहीच घडलं नाही'; पतीची कोर्टात लेखी कबुली आणि पुण्याच्या एका लग्नाचा असा झाला शेवट )

70 पेक्षा जास्त ठार

ही कारवाई साधी नव्हती. अल् मेन्चोच्या टोळीने सुरक्षा दलावर रॉकेट लाँचरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात 70 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये सुरक्षा दलाचे 25 जवान आणि अनेक गुन्हेगारांचा समावेश आहे. परिस्थिती इतकी बिघडली होती की अल् मेन्चोचा मृतदेह जलिस्कोमध्ये न नेता थेट मेक्सिको सिटीला नेण्यात आला, जेणेकरून त्याचे समर्थक पुन्हा हिंसाचार करू शकणार नाहीत.

अल् मेन्चोचा उजवा हातही ठार

या मोहिमेदरम्यान अल् मेन्चोचा अत्यंत जवळचा सहकारी एल तुली यालाही ठार करण्यात आले आहे. एल तुली हा या टोळीचा आर्थिक व्यवहार सांभाळायचा. त्याने एका सैनिकाला मारण्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि 14 लाख डॉलर्स इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अल् मेन्चोच्या मृत्यूमुळे जागतिक ड्रग्ज तस्करीच्या बाजारपेठेला मोठा धक्का बसला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com