मुलं किंवा मुलींन दत्तक घेतलं जातं याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मात्र कुणाला पगार देऊन आपली मुलगी केल्याचं कधी ऐकलं आहे का? मात्र असं घडलंय...एक वृद्ध महिला आपली शुश्रृषा करण्यासाठी मुलगी शोधतेय. या महिलेला दोन सख्ख्या मुली आहेत. मात्र त्यांच्याकडून कोणताही आधार मिळत नसल्याने या महिलेने आता पगार देऊन लेकीचा शोध सुरू केला आहे.
दोन मुली असतानाही एकटीच...
आईने सांगितलं, तिला दोन मुली आहेत. पहिली मुलगी अजिबातच संपर्क ठेऊ इच्छित नाही. तर दुसरी मानसिकदृष्ट्या सक्षम नाही. ती स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही. महिलेला अस्थमा आहे. त्यामुळे ती १०० मीटर चालली तरी तिला दम लागतो. वय आणि परिस्थिती पाहता तिला कोणाची तरी गरज आहे. जी व्यक्ती तिला डॉक्टरांकडे घेऊन जाईल, घराकडे लक्ष ठेवेल आणि लेकीप्रमाणे तिची काळजी घेईल.
नक्की वाचा - Job Loss Viral Video: नोकरी गेली... घरात आईनं दोन घासही विचारले नाहीत; तरुणाचा 'हा' व्हिडिओ पाहून मन हेलावेल!
प्रत्येक महिन्याला पगार आणि फ्लॅटही मिळणार...
महिलेची काळजी घेण्याच्या बदल्याने ती होणाऱ्या लेकीला मोठी ऑफर देत आहे. तिच्या दोन फ्लॅटपैकी एक फ्लॅट होणाऱ्या लेकीला मिळेल. त्याशिवाय तिच्या पेन्शनमधून 3,000 युआन (सुमारे $420) (37,623 रुपये) इतका मासिक पगार देण्यास महिला तयार आहे. चिनी माध्यमांनुसार, महिलेकडे 400,000 युआन (56,000 डॉलर्स) ची अतिरिक्त बचत देखील आहे. महिलेला ही व्यवस्था पूर्णपणे कायदेशीर हवी आहे. त्यामुळे होणाऱ्या लेकीसोबत ती अधिकृत करार करण्यास देखील तयार आहे.
या महिलेच्या मोठ्या मुलीने सांगितलं, ती बेरोजगार आहे आणि आईची काळजी घेण्यास असमर्थ आहे. आईचे निर्णय तिचे वैयक्तिक आहेत. काही वर्षांपूर्वी आईने बाबांकडून घटस्फोट घेतला. हळूहळू ती नातेवाईकांपासून दूर जाऊ लागली. अशा स्वभावामुळे आता तिला काळजी घेणाऱ्या लेकीचा शोध घ्यावा लागत आहे.