Elon Musk net worth: जगातील आघाडीचे उद्योगपती एलन मस्क यांच्या संपत्तीने आता असा काही विक्रम केला आहे, जो ऐकून संपूर्ण जग अचंबित झाले आहे. त्यांची कंपनी 'स्पेसएक्स' अमेरिकी शेअर बाजारात विक्रमी आयपीओसह लिस्ट झाली आणि मस्क यांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल 139 अब्ज डॉलरची प्रचंड वाढ झाली.
या ऐतिहासिक तेजीमुळे एलन मस्क हे जगातील पहिले 'ट्रिलियनेअर' म्हणजेच खरबपती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मस्क यांची एकूण संपत्ती आता तब्बल 1.11 ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे. ही अफाट संपत्ती नेमकी किती मोठी आहे, हे समजून घेण्यासाठी जेव्हा आम्ही एआय टूल्सची मदत घेतली, तेव्हा अत्यंत रंजक आणि चक्रावून टाकणारे आकडे समोर आले आहेत.
1 ट्रिलियन डॉलर म्हणजे नक्की किती?
सर्वप्रथम 1 ट्रिलियन डॉलर ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये किती होते, हे गणित समजून घेणे गरजेचे आहे. सध्याच्या 95.11 च्या एक्सचेंज रेटनुसार विचार केल्यास, 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे तब्बल 95.11 लाख कोटी रुपये होतात.
ही रक्कम इतकी अवाढव्य आहे की या पैशांमधून जगातील अनेक छोट्या देशांचा कारभार अनेक वर्षांपर्यंत अगदी सहज चालवला जाऊ शकतो. मस्क यांची सध्याची एकूण संपत्ती 1.11 ट्रिलियन डॉलर असून भारतीय चलनानुसार ती साधारण 105.64 लाख कोटी रुपयांच्या घरात जाते.
( नक्की वाचा : होर्मुझ बंद असतानाही अमेरिकेनं कसं काढलं 10 कोटी बॅरल तेल? NDTV ने शोधून काढले सॅटेलाइट पुरावे )
भारतातील टॉप 10 कंपन्यांपेक्षाही श्रीमंत
देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांचा विचार केला तर रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक यांसारख्या बलाढ्य कंपन्यांची नावे डोळ्यांसमोर येतात. मात्र, एआयने दिलेल्या माहितीनुसार, जर भारतातील टॉप 10 कंपन्यांचे एकूण मार्केट व्हॅल्यूएशन एकत्र केले, तरीही एलन मस्क यांची एकट्याची संपत्ती त्या सर्वांच्या एकूण मूल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भरेल.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, भारतातील टॉप 10 कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 88.35 लाख कोटी रुपये आहे, तर मस्क यांची एकट्याची संपत्ती 105.64 लाख कोटी रुपये आहे.
( नक्की वाचा : China News : चीनमध्ये परीक्षेच्या दिवशी महिला फक्त लाल रंगाचेच कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल थक्क )
जगातील 172 देशांपेक्षा जास्त पैसा
एलन मस्क यांची नेटवर्थ आता जगातील 172 देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक झाली आहे. सिंगापूर, न्यूझीलंड, इस्रायल आणि कतार यांसारख्या प्रगत आणि श्रीमंत देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मस्क यांच्या संपत्तीने मागे टाकले आहे. तैवान (0.98 ट्रिलियन डॉलर), आयर्लंड (0.78 ट्रिलियन डॉलर), इस्रायल (0.72 ट्रिलियन डॉलर), अर्जेंटिना (0.69 ट्रिलियन डॉलर) आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई (0.62 ट्रिलियन डॉलर) या देशांच्या एकूण जीडीपीपेक्षा मस्क खूप पुढे निघून गेले आहेत. तर स्वित्झर्लंड (1.15 ट्रिलियन डॉलर) आणि पोलंड (1.13 ट्रिलियन डॉलर) या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या ते अगदी जवळ पोहोचले आहेत.
भारताचा संपूर्ण गहू 35 वेळा खरेदी करण्याची ताकद
एलन मस्क यांच्या संपत्तीची तुलना भारताच्या वार्षिक गहू उत्पादनाशी केली तर एक अतिशय रंजक आकृतीबंध समोर येतो. भारतात वर्षभरात साधारण 110 ते 115 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होते. गव्हाचा सरासरी दर 25 रुपये प्रति किलो पकडला, तर देशातील एकूण वार्षिक गहू उत्पादनाची किंमत साधारण 2.7 ते 2.9 लाख कोटी रुपये होते.
मस्क यांच्याकडे असलेल्या 105.64 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचा विचार करता, ते भारताचे संपूर्ण वर्षभराचे गहू उत्पादन तब्बल 35 वेळा खरेदी करू शकतात.
जगातील प्रत्येक नागरिकाला देऊ शकतात 8 हजार रुपये
मस्क यांच्या अफाट श्रीमंतीचा अंदाज यावरूनही लावता येतो की, त्यांनी ठरवले तर ते जगातील सर्व 8 अब्ज लोकांना प्रत्येकी 8,000 रुपये वाटू शकतात. संपूर्ण जगाला हे पैसे वाटल्यानंतरही त्यांच्या खिशातून केवळ 800 अब्ज डॉलर खर्च होतील. त्यानंतरही त्यांच्याकडे 300 अब्ज डॉलरहून अधिक संपत्ती शिल्लक राहील आणि तरीही ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्याच क्रमांकावर राहतील.
स्पेसएक्सच्या आयपीओने रचला इतिहास
एलन मस्क यांच्या या अफाट संपत्ती वाढीमागे स्पेसएक्स कंपनीच्या आयपीओचे मोठे योगदान आहे. स्पेसएक्सने बाजारात सुमारे 55.56 कोटी शेअर्सची विक्री केली. या दमदार लिस्टिंगमुळे स्पेसएक्स आता अमेरिकेतील 7 व्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी बनली असून तिने मस्क यांच्याच टेस्ला कंपनीला मागे टाकले आहे.
यापूर्वी जगातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम सौदी अरामको कंपनीच्या नावावर होता, ज्यांचे मूल्य 25.6 अब्ज डॉलर होते. स्पेसएक्सने 75 अब्ज डॉलरच्या आयपीओसह हा जुना विक्रम तब्बल 3 पट मोठ्या फरकाने मोडीत काढला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world