China News : एखाद्या परीक्षेसाठी संपूर्ण देशातील यंत्रणा ठप्प होणे, पालकांनी कामावरून सुट्ट्या घेणे, परीक्षा केंद्राबाहेर तासन्तास लाल रंगाचे कपडे घालून उभे राहणे आणि मुलांच्या हातात सूर्यफुलाची फुले देणे, अशी कल्पना तुम्ही कधी केली आहे का? शेजारील देश असलेल्या चीनमध्ये सध्या असाच काहीसा अद्भूत आणि थक्क करणारा दृश्य पाहायला मिळत आहे.
चीनमध्ये दरवर्षी होणारी गाओकाओ ही परीक्षा केवळ विद्यार्थ्यांची परीक्षा मानली जात नाही, तर तो संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांचा आणि प्रतिष्ठेचा लढा मानला जातो. या परीक्षेदरम्यान चीनमधील रस्ते, सोशल मीडिया आणि संस्कृतीमध्ये एक वेगळाच रंग पाहायला मिळतो, जो कोणत्याही नव्या व्यक्तीला चकीत करू शकतो.
नेमकी काय आहे ही गाओकाओ परीक्षा?
गाओकाओ ही चीनमधील राष्ट्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा आहे, जी दरवर्षी जून महिन्यात घेतली जाते. 2026 मध्ये ही परीक्षा 7 जून ते 10 जून दरम्यान पार पडली असून यामध्ये तब्बल 1.29 कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या परीक्षेमध्ये मिळणाऱ्या मार्क्सच्या आधारे विद्यार्थ्यांना चीनमधील प्रसिद्ध विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे चीनमधील सर्वोत्तम करिअर आणि उज्ज्वल भविष्याचा मार्ग याच परीक्षेतून जातो, अशी तिथल्या लोकांची ठाम श्रद्धा आहे.
( नक्की वाचा : फुटबॉल प्रेमींसाठी गूड न्यूज! 1 रुपयाही खर्च न करता मोबाईल, टीव्हीवर फ्री दिसणार FIFA World Cup 2026 चे सामने )
आयुष्य बदलून टाकणारी सर्वात कठीण परीक्षा
विशेषतः लहान शहरांमधील आणि सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांसाठी गाओकाओ परीक्षा म्हणजे त्यांचे नशीब बदलण्याची सर्वात मोठी संधी असते. म्हणूनच विद्यार्थी अनेक वर्षांपासून या एकाच परीक्षेसाठी अहोरात्र तयारी करत असतात. पालकांसाठी हा काळ अत्यंत भावनिक असतो.
आपले मुले परीक्षा हॉलमध्ये पेपर लिहीत असताना, शेकडो माता-पिता परीक्षा केंद्राबाहेर उन्हातानात तासन्तास उभे राहून त्यांच्यासाठी प्रार्थना करताना दिसतात. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांचे तिथे उपस्थित राहणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
( नक्की वाचा : देशातील 7 कोटी महिला सोडणार नोकरी? धक्कादायक अहवालाने कॉर्पोरेट जगतात खळबळ! वाचा काय आहे कारण? )
सूर्यफुलाचे गुच्छ आणि लाल कपड्यांचे रंजक रहस्य
या परीक्षेच्या दिवसांमध्ये चीनच्या रस्त्यांवर दोन गोष्टी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतात, त्या म्हणजे सूर्यफुलाची फुले आणि लाल रंगाचे कपडे. परीक्षा संपवून बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात सूर्यफुलाचे मोठे गुच्छ दिले जातात. सूर्यफूल हे यश, प्रगती आणि उज्ज्वल भविष्याचे प्रतीक मानले जाते. याशिवाय, परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या बहुतांश माता लाल रंगाचे कपडे परिधान करतात. चीनी संस्कृतीमध्ये लाल रंग हा सुख, समृद्धी आणि चांगल्या नशिबाचे प्रतीक मानला गेल्याने, आपल्या मुलांचे निकाल उत्तम यावेत यासाठी हा खास पेहराव केला जातो.
विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशाचे नियम बदलतात
गाओकाओ परीक्षेचे गांभीर्य इतके मोठे आहे की, या दिवसांमध्ये चीनमधील अनेक शहरांमधील वाहतुकीचे नियम पूर्णपणे बदलले जातात. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून विशेष मार्गिका तयार केल्या जातात. परीक्षा केंद्रांच्या आसपास हॉर्न वाजवण्यास किंवा कोणताही मोठा आवाज करण्यास सक्त मनाई असते.
स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा केवळ या परीक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवतात. लाल कपड्यांच्या परंपरेपासून ते सूर्यफुलाच्या गुच्छांपर्यंत, ही परीक्षा चीनमधील करोडो कुटुंबांसाठी केवळ एक चाचणी नसून एक भावनिक उत्सव बनली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world