एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना साता समुद्रापार परदेशातही गणेशोत्सलाचा उत्साह दिसून येतोय. परदेशात स्थायिक झालेल्या किंवा कामा निमित्त असलेल्या मराठी माणसाने गणेशोत्सव साजरा केला आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड शहरात हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा राजा म्हणून मराठी मंडळी हा उत्सव साजरा करत आहेत. या गणेशोत्सवाचे हे नववे वर्ष आहे. परदेशात असले तरी आपली परंपरात, आपली संस्कृती आणि आपले सण इथल्या मराठी माणसाने जपले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑस्ट्रेलियातील अॅडलेड शहरात मोठ्या संख्येने मराठी लोक राहातात. त्यामुळे त्यांनी इथं आपली संस्कृती जपली आहे. आज गणेशाचं आगमन ऑस्ट्रेलियातही झालं आहे. यावेळी मराठमोळी वेशभूषा करत गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. हातात भगवे झेंडे, डोक्याला फेटे, महिलांच्या नववारी साड्या, तर पुरूषांनी घातलेले सदरे यामुळे ऑस्ट्रेलियातील लोकांचेही या मिरवणुकीकडे लक्ष वेधले होते. मिरवणुकीत ढोल ताश्या बरोबर लेझिम पथकही होते. बाप्पाची जवळपास 21 फूट उंच मुर्ती बसवण्यात आली आहे.
शहरात राहाणारी सर्व मराठी कुटुंब यावेळी एकत्र आली होती. जरी महाराष्ट्रात नसलो तरी या उत्सवाच्या निमित्ताने मिनी महाराष्ट्र ऑस्ट्रेलियात अनुभवायला मिळत होता. मोठ्या मुर्ती बरोबर पुजेच्या छोट्या मुर्तीची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्याची विधीवत पूजाही करण्यात आली. बाप्पाला प्रसादही दाखवण्यात आला. एक क्षण आपण पुण्यात किंवा मुंबईला आहोत की काय असाच भास यावेळी होत होता.
दरम्यान पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी दुपारी 12:08 वाजता सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबरला तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचे व्रत (Ganesh Chaturthi Vrat) करणे शुभ ठरेल. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 वाजेपासून ते दुपारी 1:34 वाजेपर्यंत गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तादरम्यान पूजा करणे फलदायी ठरेल.