जाहिरात

Trump vs Zelensky News : ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध, या देशांनी दिला युक्रेनला पाठिंबा

Trump vs Zelensky News : झेलेन्स्की आल्यावर ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले, मात्र ते निघताना त्यांना निरोप देण्यासाठी गेले नाहीत. या वादानंतर, जगातील अनेक देशांनी, विशेषतः युरोपीय देशांनी, झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा दिला आहे. 

Trump vs Zelensky News : ट्रम्प-झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक युद्ध, या देशांनी दिला युक्रेनला पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. रशिया-युक्रेन युद्वाबाबत ही भेट झाली. या भेटीनंतर रशिया-युक्रेन युद्धाऐवजी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या झालेल्या शाब्दिक युद्धाची जगभर चर्चा आहे.  भेटीदरम्यान जे घडले याची कुणीही कल्पना केली नसेल. 

दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक बैठकीने सुरुवात झाली. जेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांशी बोलत होते तेव्हा संपूर्ण जग, विशेषतः रशिया आणि युरोपीय देश त्यांचे प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होते. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या अनौपचारिक संभाषणाचे रूपांतर काही वेळेतच वादविवादात झाले. 

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स देखील तिथे उपस्थित होते. रशिया-युक्रेन युद्धावरून ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील वादविवाद वाढला तेव्हा उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही झेलेन्स्की यांना कडक स्वरात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु झेलेन्स्की यांनी कुणाचेही न ऐकता आपली बाजू मांडली.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी आले तेव्हा ते आपली भूमिका सोडून युद्ध संपवण्याच्या दिशेने वाटचाल करतील अशी अपेक्षा होती. मात्र नेमकं उलट घडलं. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातील वादविवादानंतर झेलेन्स्की व्हाईट हाऊसमधून निघून गेले. झेलेन्स्की आल्यावर ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले, मात्र ते निघताना त्यांना निरोप देण्यासाठी गेले नाहीत. या वादानंतर, जगातील अनेक देशांनी, विशेषतः युरोपीय देशांनी, झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा दिला आहे. 

नेमकं काय घडलं? 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोठ्या आणि कडक आवाजात झेलेन्स्की यांना सांगितलं की,  "एकतर करार करा किंवा आम्ही बाहेर पडू. तुम्ही मोठ्या संकटात आहात. तुम्ही जिंकणार नाहीत." यावर झेलेन्स्की यांनी म्हटलं की, "आम्ही आमच्या देशात आहोत आणि आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आम्ही तुमच्या पाठिंब्याबद्दल आभार देखील मानले आहेत." 

ट्रम्प यांनी पुढे म्हटलं की, "मला भीती वाटते की गोष्टी हाताळण्याच्या या पद्धतीमुळे गोष्टी खूप कठीण होतील. तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी खेळत आहात. तुम्ही जे करत आहात ते युक्रेनचा खूप अनादर करणारे आहे. आम्ही तुम्हाला 350 अब्ज डॉलर्स दिले आहेत, आम्ही तुम्हाला लष्करी साहित्य आणि भरपूर पाठिंबा दिला आहे. जर तुमच्याकडे आमची लष्करी उपकरणे नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपले असते."

यावर झेलेन्स्की यांनी म्हटलं की, "हो, ते दोन-तीन दिवसही टिकू शकत नाही, मी हे पुतिनकडूनही ऐकले आहे." झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया ऐकून ट्रम्प म्हणाले, "अशा प्रकारे काम करणे खूप कठीण जाणार आहे."

या युरोपीयन देशांचा युक्रेनला पाठिंबा

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या जोरदार वादविवादानंतर, अनेक युरोपीय देशांनी झेलेन्स्की आणि युक्रेनला पाठिंबा दिला आहे. यामध्ये जर्मनी, फ्रान्स, पोलंड, नेदरलँड्स, कॅनडा, चेक रिपब्लिक, स्‍पेन सारख्या देशांचा समावेश आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: