अवैध मार्गाने लोकांना परदेशात पाठवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पाकिस्तानमध्ये पर्दाफाश झाला आहे. एका आरोपीने 22 पाकिस्तानी नागरिकांना फुटबॉल टीमचे खेळाडू बनवून त्यांना जपानला पाठवण्याचा प्रयत्न केला. पण जपानमधील विमानतळावरच या खेळाडूंचा बनाव उघडकीस आला. त्यानंतर त्यांना पुन्हा पाकिस्तानला पाठवण्यात आले, जिथे त्यांना अटक करण्यात आली. हा प्रकार खेळाच्या नावाखाली मानवी तस्करी करण्याचा मोठा कट असल्याचे समोर आले आहे.
गल्फ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जपानी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर सर्व 22 लोकांना परत पाकिस्तानला पाठवले. तिथे पाकिस्तानच्या फेडरल इन्वेस्टिगेशन एजन्सीने (FIA) त्यांना अटक केली आहे.
(नक्की वाचा- Pakistan vs UAE: पाकिस्तान क्रिकेटचा ड्रामा, ICC चा एक इशारा, 2 मोठे धोके... म्हणून घातले लोटांगण)
बनावट फुटबॉल क्लब आणि प्रशिक्षण
एफआयएने याला मानवी तस्करीचे एक मोठे प्रकरण म्हटले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार मलिक वकास असून, तो सियालकोटच्या पसरूर येथील रहिवासी आहे. त्याने लोकांना जपानला पाठवण्यासाठी ‘गोल्डन फुटबॉल ट्रायल' नावाचा एक बनावट फुटबॉल क्लब तयार केला होता. या क्लबला पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनशी संलग्न असल्याचेही दाखवण्यात आले होते. या 22 लोकांना फुटबॉल खेळाडू असल्यासारखे वागण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आले होते.
40 लाख रुपये प्रति व्यक्ती
जपानी अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेले ‘ना हरकत प्रमाणपत्र' सादर केले. याच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सियालकोट विमानतळावरून जपानसाठी उड्डाण केले होते. तपासामध्ये असेही समोर आले आहे की, आरोपी वकासने जपानच्या प्रवासासाठी प्रत्येक व्यक्तीकडून 40 लाख पाकिस्तानी रुपये घेतले होते.
( नक्की वाचा : Asia Cup 2025: आशिया कपमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानची बहिष्काराची भाषा आणि पुन्हा.... )
एफआयएने 15 सप्टेंबर रोजी वकासला अटक केली असून, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वकासने यापूर्वीही जानेवारी 2024 मध्ये 17 लोकांना जपानला पाठवले होते. प्रत्येकाने जपानी क्लब बोविस्टा एफसीकडून बनावट निमंत्रण घेऊन 15 दिवसांचा व्हिसा मिळवला होता. त्यातील एकही व्यक्ती अजून परत आलेली नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या मीडियाने दिली आहे.