Donald Trump's Latest Statement: अनपेक्षित आणि खळबळजनक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर धक्कादायक दावा केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारत आणि अमेरिका संबंध ताणले गेले आहेत. त्यानंतर ट्रम्प यांनी भारत आणि रशियाचं नाव घेत एक मोठी कबुली दिलीय.
काय म्हणाले ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने भारत आणि रशियासारखे महत्त्वाचे भागीदार गमावले आहेत. "असे दिसते आहे की आपण भारत आणि रशियाला 'अतिशय गूढ आणि अंध:कारमय' चीनमुळे गमावले आहे," असे त्यांनी आपल्या 'Truth Social' अकाउंटवर लिहिले आहे.
या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी उपहासात्मकपणे म्हटले की, "त्यांना (भारत, रशिया, चीन) एकत्र एक दीर्घ आणि समृद्ध भविष्य लाभो!" नुकत्याच झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. या बैठकीत ऊर्जा आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाली, ज्यामुळे ट्रम्प यांनी हे विधान केले असावे असे मानले जात आहे.
ट्रम्प यांची कबुली
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि रशिया आणि चीन यांच्यातील वाढत्या जवळीकीबाबत ट्रम्प यांनी दिलेली ही सर्वात स्पष्ट सार्वजनिक कबुली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून भारताला चीनच्या वाढत्या वर्चस्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा मित्र मानत होती. 2019 मध्ये ह्यूस्टन येथील "हाउडी मोदी" रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींसोबत दिसले होते. त्याचबरोबर अमेरिकेने भारत जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग (Quad) पुन्हा सुरू केला होता. हा गट चीनच्या आव्हाचा सामना करण्यासाठीच केला होता, असं मानलं जात होतं.
( नक्की वाचा : Donald Trump : धक्कादायक खुलासा! नोबेलसाठी ट्रम्प यांचा मोदींना फोन, 'ती' मागणी फेटाळताच संबंध बिघडले )
मात्र, युक्रेनमधील युद्ध आणि व्यापारासारख्या मुद्द्यांवर भारत आणि अमेरिकेच्या भूमिकांमध्ये असलेले मतभेद यामुळे ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळा टॅरिफ धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.