
Chhatrapati Shivaji Maharaj Keertirath: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये 17 ऑगस्ट 2025 रोजी 'इंडिया डे' परडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती फाऊंडेशनने (Chhatrapati Foundation) छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तीरथ सादर केला आणि जंगी मिरवणूक काढली. अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. लेझीम आणि ढोलच्या गजराने सारेजण भारावून गेले होते.
परेड ग्रँड मार्शलचा मान अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवेरकोंडा यांना देण्यात आला होता. मिशीगन राज्याचे US हाऊस ऑफ रेप्रेझेंटेटीव्ह (खासदार) श्री ठाणेदार यांनी कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली होती. ठाणेदार यांनी रथावरून रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला अभिवादन केले. न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक आडम्स यांनी परेडचा शुभारंभ केला.

Photo Credit: Chhatrapati Foundation New York USA
"छत्रपती फाऊंडेशनचा कीर्तीरथ दरवर्षीच दिमाखदार असतो, पण त्यापेक्षाही त्यांचे कार्य अधिक दिमाखदार असते", असे गौरवोद्गार भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत बिनया प्रधान यांनी यावेळेस काढले.
(नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना मिळायचा पगार आणि बोनस, दिवसही निवडला होता खास)

Photo Credit: Chhatrapati Foundation New York USA
तेथील भारतीय नागरिकांनी शिवाजी महाराज, जिजाऊ, बाल शिवबा आणि मावळ्यांप्रमाणेची वेशभूषा परिधान करुन कीर्तीरथामध्ये सहभाग नोंदवला होता. लहान मुले, महिला आणि युवकांनी दिमाखदार अभिनय तसेच आकर्षक पोशाखाद्वारे ऐतिहासिक क्षण जीवंत केले. कीर्तीरथासोबत जल्लोश ढोल ताशा पथकाच्या 50 हून अधिक वादकांच्या उत्तम सादरीकरणामुळे न्यूयॉर्क शहर दुमदुमून गेले होते. बॉलिवूड नाट्य दिग्दर्शक संदेश रेड्डी यांच्या रुद्र डान्स अकॅडमीतील विद्यार्थिनींनी लेझीमसह विविध नृत्याचे सादरीकरण केले.
(नक्की वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार तुमच्या जीवनात घडवतील बदल)

Photo Credit: Chhatrapati Foundation New York USA
100 हून अधिक लोकांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीचे भव्य प्रदर्शन सातासमुद्रापार उत्तमरित्या साकारले. New York Parade Life या वृत्तपत्राने शिवछत्रपती कीर्तीरथाला "Best Float (रथ)" म्हणत शिवराज्याचा संदर्भ अमेरिकेच्या लोकशाही मुळांशी जोडला आहे, असे नमूद केले.

Photo Credit: Chhatrapati Foundation New York USA
विद्यार्थी आणि तरुणांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्क ही संस्था मागील 15 वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती, जिजाऊ जयंती, अहिल्यादेवी जयंती, आंबेडकर जयंतीच्या माध्यामातून अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. यावर्षी संस्थेतर्फे न्यूयॉर्कस्थित भारतीय दूतावासामध्ये शिवजयंतीचेही आयोजन करण्यात आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world