काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा पूर्णपणे हात असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना कायमची अद्दल घडवली जाईल असा इशाराही भारताने दिला आहे. त्यात भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमीका घेतली आहे. यानंतर दोन्ही अणुशक्ती राष्ट्रांमध्ये तणाव वाढला आहे. भारत कधीही आक्रमण करेल अशी भिती पाकिस्तानला आहे. त्यामुळे टरकलेल्या पाकिस्तानने घाबरून आपल्या क्षेपणास्त्रांचे परीक्षण करण्याचा धडाका लावला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानने सोमवार, 5 मे ला फतह मालिकेतील जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 120 किलोमीटर मारक क्षमतेच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचा दावा केला आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, पाकिस्तान लष्कराच्या ISPR ने हा दावा केला आहे. गेल्या 3 दिवसांत पाकिस्तानने आपल्या “Ex INDUS” चा भाग म्हणून दुसऱ्यांदा क्षेपणास्त्राचे परीक्षण केले आहे. पाकिस्तानच्या मनात आक्रमण होईल ही धास्ती आहे. त्यातून त्यांनी हे पाऊल उटललं आहे.
यापूर्वी शनिवारी, ISPR ने म्हटले होते की पाकिस्तानने 450 किमीच्या मारक क्षमतेच्या अब्दाली वेपन सिस्टीम या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी मे मध्ये पाकिस्तानच्या लष्कराने फतह-II ही रॉकेट प्रणालीची चाचणी केली होती. त्याची मारक क्षमता 400 किलोमीटर होती. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान या चाचण्या पाकिस्तानने केल्या आहेत.
3 मे रोजी सूत्रांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की पाकिस्तान जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करण्याच्या तयारीत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध कठोर पावलं उचलली. सिंधू जल करार स्थगित करण्यात आला. केंद्र सरकारने सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले होते. यासोबतच भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा त्वरित निलंबित केले होते. या सर्व गोष्टींमुळे पाकिस्तानची टरकली आहे.