असे म्हणतात की, नशीब कधी कोणाचे दार ठोठावेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण अबू धाबीमध्ये नोकरी करणाऱ्या संदीप कुमारसाठी नशिबाने दारच नाही, तर संपूर्ण खजिनाच उघडला आहे. उत्तर प्रदेशच्या एका छोट्या शहरातून येऊन अरब देशात घाम गाळणारा संदीप आता करोडपतींच्या यादीत सामील झाला आहे. संदीपला लॉटरीत 15 मिलियन दिरहम म्हणजेच सुमारे 35 कोटी रुपयेचा जॅकपॉट लागला आहे. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला संदीप कुमार प्रसाद गेल्या तीन वर्षांपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहत आहे. 30 वर्षीय संदीप दुबई ड्राईडॉक्समध्ये तंत्रज्ञ (technician) म्हणून काम करतो. रोज मशीनसोबत झगडणाऱ्या संदीपला कदाचित कल्पनाही नसेल की, एक तिकीट त्याचे आयुष्य इतके बदलून टाकेल.
खलीज टाईम्सच्या (Khaleej Times) मते, संदीपने ही लॉटरी अबू धाबी बिग टिकट सिरीज 278 मध्ये जिंकली आहे. 3 सप्टेंबर रोजी या लॉटरीचा ड्रॉ काढण्यात आला होता. न्यूज पोर्टलच्या रिपोर्टनुसार, संदीपने 20 इतर लोकांसोबत मिळून ग्रुपमध्ये लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तिकीट नंबर 200669 त्याच्यासाठी भाग्यवान ठरला. संदीपने फक्त तीन महिन्यांपूर्वीच लॉटरीचे तिकीट खरेदी करायला सुरुवात केली होती. त्याला कधीच विश्वास नव्हता की त्याचीही लॉटरी लागेल. पण नशिबाने अखेर त्याचे दार ठोठावले. जेव्हा बिग टिकटच्या होस्टने त्याला बक्षीस जिंकल्याची माहिती देण्यासाठी फोन केला, तेव्हा त्याला एकदा तर विश्वासच बसला नाही. पण जेव्हा विश्वास बसला, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
एका छोट्या नोकरीवर असलेला संदीप आता करोडपती बनून यूएईहून भारतात परतण्याचा विचार करत आहे. या रकमेतून तो भारतात परत आल्यावर काय करणार आहे हे त्याने सांगितले. संदीपच्या मते, तो त्याच्या वडिलांवर उपचार करेल. कुटुंबाला चांगले जीवन देईल आणि स्वतःचा व्यवसायही सुरू करेल. संदीपने गल्फ न्यूजला सांगितले की, तो विवाहित आहे. त्याला दोन भाऊ आणि एक बहीण आहे. परदेशात राहूनही तो घराची पूर्ण जबाबदारी सांभाळत होता. त्याच्या वडिलांची तब्येत नेहमीच खराब असते. यामुळे तो खूप काळजीत असायचा.
GST Rate Cut: सर्वसामन्यांना मोठा दिलासा! जीएसटी कर बदलांमुळे 'या' वस्तू होणार स्वस्त, वाचा यादी
आता या लॉटरीने त्याला स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य सुधारण्यासाठी एक नवी ताकद आणि आशा दिली आहे. संदीपचे विजेते तिकीट सबुज मिया आमिर हुसैन यांनी काढले. सबुज मिया यांनी 3 ऑगस्ट रोजी 2 कोटी दिरहम सुमारे 48 कोटी रुपये लॉटरीचे बक्षीस जिंकले होते. सबुज मिया बांगलादेशी शिंपी (tailor) आहेत. ते दुबईमध्ये राहतात. विशेष म्हणजे, त्यांनी पहिल्यांदाच हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि पहिल्याच वेळी त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडला.