Iran Drone Attack Near Dubai International Airport : इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण आपल्या शेजारील देशांनाही लक्ष्य करत आहे. मंगळवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात इराणने दोन ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) सतर्क सुरक्षा यंत्रणांनी हे दोन्ही ड्रोन हवेतच नष्ट केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
भारतीय नागरिक किरकोळ जखमी
'दुबई मीडिया ऑफिस'ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ड्रोन नष्ट केल्यानंतर त्याचे अवशेष खाली पडल्यामुळे काही लोक जखमी झाले आहेत. यात एक भारतीय, एक बांगलादेशी आणि एक घानाचा नागरिक किरकोळ जखमी झाला आहे. सर्व जखमींना तातडीने प्रथमोपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
(नक्की वाचा- पालघर समुद्रकिनारी खळबळ! अचानक हेलिकॉप्टर उतरल्याने नागरिकांची पळापळ, चौकशीनंतर सत्य आलं समोर)
विमानतळावरील सध्याची स्थिती
हल्ल्याचा प्रयत्न झाला असला तरी दुबई विमानतळावरील कामकाज थांबवण्यात आलेले नाही. प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, सर्व विमाने नियोजित वेळेनुसार उड्डाण करत आहेत. विमानतळ आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026 Final: अंतिम सामन्यात धोनी-रोहित उपस्थित, विराट कोहली का दिसला नाही?)
इराण आक्रमक
गेल्या काही दिवसांपासून इराण सातत्याने दुबई आणि आसपासच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न करत आहे. इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम म्हणून इराण आता इस्रायलच्या मित्र देशांना किंवा त्यांच्याशी संबंध असलेल्या व्यापारी केंद्रांना लक्ष्य करत असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे आखाती देशांमधील शांतता धोक्यात आली असून, जागतिक व्यापारावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.