Iran Israel Row : पश्चिम आशियामधील इराण आणि इस्रायल या दोन देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं जाणं टाळा, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयानं दिला आहे. या निर्देशानंतर 24 तासांमध्येच भारतीयांच्या काळजीत भर टाकणारी बातमी समोर आलीय. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनी यूएईच्या किनाऱ्यावर इस्रायलचा एक कंटेनर जहाज जप्त केलं आहे. या जहाजातील 25 जणांपैकी 17 सदस्य भारतीय आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. IRNA या न्यूज एजन्सीनं हे वृत्त दिलंय. MSC Aries असं जप्त करणाऱ्यात आलेल्या कंटेनर जहाजाचं नाव आहे.
या जहाजाच्या मालकी असलेल्या इतलावी-स्विस समुहानं याबाबत वक्तव्य प्रसिद्ध केलंय. त्यानुसार 'सध्या इराणच्या ताब्यात असलेल्या या जहाजात 25 जण असून त्यांची सुरक्षा आणि जहाज सुखरुप ताब्यात घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आम्ही काम करत आहोत,' असं कंपनीनं स्पष्ट केलंय.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे हे जहाज जप्त करण्यात आलं आहे. इराण इस्रायलवर हल्ला करु शकतं अशी भीती सध्या जगाला भेडसावतीय. दोन आठवड्यापूर्वी सीरियातील दमिश्कमधील दुतावासाच्या विभागावर हवाई हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यात इराणच्या सैन्यातील दोन जनरलसह सात जण मारले गेले होते. त्यानंतर या हल्ल्याला उत्तर देण्याचा इशारा इराणनं दिला आहे.
इस्रायलचा इशारा
हे जहाज जप्त करण्यात आल्यानंतर इस्रायल सैन्यही आक्रमक झालंय. या सैन्याच्या प्रवक्त्यानं इराणला परिणामांना सज्ज राहण्याचा इशारा दिला आहे. इराण या जगात दहशतवादाला खतपाणी घालणारा सर्वात मोठा देश आहे. या दहशतवादी नेटवर्कपासून केवळ इराण, गाझा, लेबनॉन आणि सीरियातील लोकांना धोका नाही. इराण सरकार युक्रेन आणि त्याच्या बाहेरही युद्धाला चालना देक आहे. आम्ही इराणच्या हल्ल्यापासून इस्रायलचं संरक्षण करण्यासाठी सज्ज होत आहोत.'