- इराण आणि इस्रायल यांच्यात मध्य पूर्वेतील संघर्ष सुरू असून संपूर्ण खाडी क्षेत्र युद्धभूमीमध्ये परिवर्तित झाले
- ओमानने १९७० च्या दशकापासून इराणशी मैत्रीपूर्ण संबंध राखले असून त्याच्या विरोधात इराणने कधीही हल्ला केला नाही
- ओमानने गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल सदस्य असूनही इराणविरोधी भूमिका न घेता अमेरिका-इराण संवादात मध्यस्थी केली आहे
मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यात थेट संघर्ष सुरू झाला आहे. संपूर्ण खाडी क्षेत्र युद्धभूमी बनले आहे. दुबईपासून दोहापर्यंत क्षेपणास्त्रांचा थरार पाहायला मिळत असताना, ओमान मात्र यातून पूर्णपणे अलिप्त राहिला आहे. 'मध्य पूर्वेतील स्वित्झर्लंड' अशी ओळख असलेल्या ओमानवर इराणने एकही हल्ला का केला नाही, यामागे 50 वर्षांचा इतिहास आणि मुत्सद्देगिरी कारणीभूत आहे. पण त्याच वेळी इराण दुबई, सौदी अरेबिया, बहरीन या मुस्लीम देशांवर हल्ले चढवत आहे. या मागचे नक्की कारण काय आहे हेही आपण पाहणार आहोत.
इराण आणि ओमानमधील संबंधांची मुळे 1970 च्या दशकात आहेत. तत्कालीन ओमानचे सुलतान काबूस बिन सैद यांच्या विरोधात जेव्हा मार्क्सवादी बंडखोरांनी उठाव केला होता, तेव्हा इराणच्या शहाने ओमानच्या मदतीला हजारो सैन्य धाडले होते. 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतरही ओमानने इराणशी असलेले संबंध तोडले नाहीत, जे आजही कायम आहेत. त्यामुळे गल्फमधील इतर राष्ट्रां विरोधात इराणने हत्यार उपसले असताना आपल्या जुन्या मैत्रीसाठी ओमान विरोधात काही कारवाई इराणने केलेली नाही.
ओमान हा 'गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल'चा (GCC) सदस्य असला, तरी त्याने कधीही इराणविरोधी भूमिका घेतली नाही. उलट, अमेरिका आणि इराण यांच्यातील संवाद घडवून आणण्यासाठी ओमानने नेहमीच 'बॅक-चॅनेल' मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. 2015 चा प्रसिद्ध अणू करार ओमानमधील गुप्त चर्चेमुळेच शक्य झाला होता. त्यामुळे इराण प्रमाणे ओमानने ही आपली मैत्री आजतागायत जपली आहे. त्यामुळे या युद्ध काळात ही ओमान इराणबाबत सॉफ्ट कॉर्नर बाळगून आहे.
इराण आणि ओमान हे दोन्ही देश 'होरमुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) या जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल मार्गावर नियंत्रण ठेवतात. या मार्गातील स्थिरता दोघांच्याही फायद्याची आहे. तसेच, इराण-ओमान गॅस पाईपलाईन प्रकल्प इराणसाठी जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार ठरू शकतो. त्यामुळे ओमानला दुखावणे इराणला परवडणारे नाही. ओमानला 'मध्य पूर्वेतील स्वित्झर्लंड' म्हटले जाते. कोणत्याही वादात न पडता शांततेचा मार्ग निवडणे ही ओमानची ओळख आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जेव्हा कधी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ओमान हाच देश दोघांना चर्चेच्या टेबलावर आणण्याचे काम करतो.
तर दुसरीकडे दुबई असेल, सौदी अरेबिया असेल किंवा बहरीन असेल हे मुस्लीम देश आहे. पण या देशातील बहुतांश मुस्लीम हे सुन्नी देश आहे. शिवाय त्यांचे अमेरिके सोबत चांगले संबंध आहेत. या देशामध्ये अमेरिकेचे काही सैनिकी तळ आहेत. या देशांची अमेरिके सोबत मैत्रीचे संबंध आहे. हे पाहात इराणने आता या देशांनाच लक्ष करण्यास सुरूवात केले आहे. त्यात खास करून अमेरिकेचे तळ लक्ष केले जात आहेत. त्यामुळे या देशांना काही प्रमाणात मोठा फटका बसल्याचं ही दिसून येत आहे.
Mass evacuation from southern Lebanon as Israel prepares for war pic.twitter.com/DLATmHhfkj
— Middle East Observer (@ME_Observer_) March 2, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world