Iran US War: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आता अंतराळ युद्धाचे रूप धारण केले आहे. इराणने आपल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसाठी अमेरिकेच्या लष्करी तळांची अचूक माहिती मिळवण्यासाठी चीनच्या एका खाजगी कंपनीने तयार केलेल्या उपग्रहाचा वापर केल्याचे समोर आले आहे. 'फायनान्शियल टाइम्स'च्या अहवालानुसार, 'TEE-01B' नावाच्या या उपग्रहाने युद्धादरम्यान इराणसाठी 'डोळे' म्हणून काम केले.
'इन-ऑर्बिट डिलिव्हरी', चीनची गुप्त रणनीती
हा उपग्रह चीनच्या 'अर्थ आय कंपनी' (Earth Eye Company) ने विकसित केला होता. हा उपग्रह अवकाशात झेपावल्यानंतर तो इराणच्या IRGC कडे हस्तांतरित करण्यात आला. या मॉडेलला 'इन-ऑर्बिट डिलिव्हरी' असे म्हटले जाते, ज्यामुळे चीन सरकारला आपला सहभाग नाकारणे सोपे जाते. इराणला बीजिंगमधील 'एम्पोसॅट' या कंपनीच्या जागतिक ग्राउंड स्टेशन नेटवर्कचा वापर करण्याची परवानगीही देण्यात आली होती.
US-Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन! 40 मिनिटे एकमेकांशी बोलले, चर्चा काय झाली?
इराणने कोणत्या तळांवर ठेवली नजर?
प्रिन्स सुलतान एअर बेस (सौदी): 13 ते 15 मार्च दरम्यान या तळाची चित्रे घेण्यात आली. त्यानंतरच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तिथे नुकसान झाल्याचे मान्य केले होते.
मुवाफक साल्टी एअर बेस (जॉर्डन): इराणने या भागातील हल्ल्याचा दावा करण्यापूर्वी इथली माहिती उपग्रहाने मिळवली होती.
युएस फिफ्थ फ्लीट (बहरीन): अमेरिकन नौदलाच्या मुख्यालयावरही पाळत ठेवली गेली.
इतर ठिकाणे: कुवेतचा कॅंप बुहरिंग, जिबूतीचा कॅंप लेमोनिअर आणि ओमानमधील डुकम विमानतळ या उपग्रहाच्या रडारवर होते.
चीनची भूमिका आणि जागतिक चिंता
पश्चिमी गुप्तचर संस्थांच्या मते, चिनी सरकार किंवा प्रशासनाच्या संमतीशिवाय कोणतीही खाजगी कंपनी अशा प्रकारे उपग्रह लॉन्च करू शकत नाही. चीन हा आखाती देशांचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि तेलाचा खरेदीदार आहे. तरीही इराणला लष्करी गुप्तचर माहिती पुरवून चीन अमेरिकेसमोर मोठे आव्हान उभे करत आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, 28 फेब्रुवारीला जेव्हा अमेरिका-इस्रायलने इराणवर बॉम्बफेक केली, तेव्हा रशियानेही इराणला आपल्या उपग्रहांची गुप्त माहिती पुरवली होती.
चीनचा नकार
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणला कोणत्याही प्रकारचे लष्करी साहाय्य देत असल्याचा वारंवार इन्कार केला आहे. मात्र, अमेरिकेच्या मते चीन अनेक वर्षांपासून इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला 'ड्युएल-युज' तंत्रज्ञान पुरवत आहे.