- ओमानच्या आखातील स्ट्रॅट ऑफ होर्मुजमध्ये शनिवारी दोन भारतीय व्यापारी जहाजांवर इराणच्या गनबोटींनी गोळीबार केला
- गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व भारतीय चालक दल सुरक्षित आहे
- इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने रेडिओ संपर्क न करता अचानक गोळीबार केला
ओमानच्या आखातातील स्ट्रॅट ऑफ होर्मुजमध्ये शनिवारी दोन भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत इराणच्या राजदूतांना तातडीने पाचारण केले आहे. शिवाय या घटनेचा निषेध नोंदवला आहे. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून जहाजांवरील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भारताकडे येणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर इराणच्या गनबोटींनी गोळीबार केला. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे समुद्रामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जहाजाच्या कॅप्टनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व भारतीय कर्मचारी सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वज असलेली ही जहाजे होर्मुजमधून भारताच्या दिशेने येत असताना इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'च्या दोन गनबोटींनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यापैकी एका जहाजात 20 लाख बॅरल तेल साठवलेले होते. गोळीबारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही जहाजांना यू-टर्न घ्यावा लागला. अमेरिकेने इराणच्या बंदरांवर लादलेल्या निर्बंधांच्या प्रत्युत्तरादाखल इराणने या जलमार्गावर पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनच्या सागरी व्यापार संचालन केंद्राने (UKMTO) या घटनेची पुष्टी केली आहे. टँकरच्या कॅप्टनने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने रेडिओवर कोणताही संपर्क न साधता थेट गोळीबार सुरू केला. सध्या भारतीय अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नौदलाची नाकाबंदी सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ही घटना घडली आहे. इराणच्या लष्करी कमांडने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत अमेरिकेची नाकाबंदी हटत नाही, तोपर्यंत होर्मुजमधून होणारी वाहतूक रोखली जाईल. भारताने याप्रकरणी आपली चिंता व्यक्त केली असून सागरी सुरक्षा धोक्यात आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात ज्या जहाजांना लक्ष्य करण्यात आले, त्यातील एकावर 20 लाख बॅरल क्रूड ऑईल होते. जर हा गोळीबार तेल साठ्याला लागला असता, तर भीषण आग लागण्याची शक्यता होती.
ओमानपासून 37 किलोमीटर अंतरावर असताना हा प्रकार घडला. इराणने शनिवारीच जाहीर केले की, त्यांनी होर्मुजवर आपले पूर्ण नियंत्रण मिळवले असून कोणालाही सहजासहजी येथून जाऊ दिले जाणार नाही. आपल्या जहाजांवर झालेल्या या हल्ल्यानंतर भारत सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या राजदूतांना बोलावून या प्रकाराचा जाब विचारला आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गावर अशा प्रकारे जहाजांना लक्ष्य करणे बेकायदेशीर असल्याचे भारताने ठणकावून सांगितले आहे. दोन्ही जहाजांवरील चालक दल सुरक्षित असून जहाजांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world