जाहिरात

US Iran War : इराणने स्वतःच्याच जनरलची केली हत्या ! वाचा ऐन युद्धात का उचललं खळबळजनक पाऊल?

Iran War News Esmail Qaani : इराणमधून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत असून यामुळे संपूर्ण जगात मोठी खळबळ उडाली आहे.

US Iran War : इराणने स्वतःच्याच जनरलची केली हत्या ! वाचा ऐन युद्धात का उचललं खळबळजनक पाऊल?
मुंबई:

Ayatollah Khamenei Assassination Plot : इराणमधून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत असून यामुळे संपूर्ण जगात मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मधील अतिशय शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या कुड्स फोर्सचे प्रमुख जनरल इस्माइल कानी यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

विशेष म्हणजे खुद्द इराणनेच आपल्या या टॉप कमांडरला यमसदनी पाठवल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये रंगली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येच्या कटात कानी यांचा सहभाग असल्याचा संशय बळावल्याने ही टोकाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मोसादशी कनेक्शन असल्याचा गंभीर संशय

अरब माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, जनरल इस्माइल कानी यांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप आहे. कानी हे इराणच्या त्या कुड्स फोर्सचे प्रमुख होते जी परदेशात इराणच्या वतीने विविध कारवाया करते. मात्र, गेल्या काही काळापासून कानी यांचे इस्रायली गुप्तचर संस्था मोसादसोबत संबंध असल्याचा संशय इराणच्या प्रशासनाला होता.

इराणच्या अंतर्गत गोटातून महत्त्वाची माहिती मोसादपर्यंत पोहोचवण्याचे काम कानी करत असल्याचा दावा केला जात आहे. इराण सरकारने अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी यूएईमधील द नॅशनल सारख्या प्रसारमाध्यमांनी या दाव्याला खतपाणी घातलं आहे.

( नक्की वाचा : Mumbai to Dubai :समोरून येत होते क्षेपणास्त्र! मुंबई-दुबई विमानाचा हवेतच थरारक यु-टर्न; पाहा काय घडलं? )
 

का वाढला संशय?

गेल्या आठवड्यात अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाली.  पण आश्चर्यकारक बाब म्हणजे इस्माइल कानी देखील या हल्ल्यातून सुखरूप बाहेर पडले होते. कानी हे वारंवार अशा मोठ्या हल्ल्यांमधून कसे वाचतात, यावरून इराणच्या सुरक्षा यंत्रणांना त्यांच्या हालचालींवर संशय येऊ लागला होता. 

ज्या ठिकाणी खामेनी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तिथून हल्ला होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी कानी यांचे तिथून गायब होणे, ही बाब ते हेर असल्याच्या संशयाला बळ देणारी आहे.  

( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )

कासिम सुलेमानी यांच्यानंतर सांभाळली होती धुरा

अमेरिकेने 2020 मध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे तत्कालीन दिग्गज कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणने मोठ्या विश्वासाने इस्माइल कानी यांच्याकडे कुड्स फोर्सची धुरा सोपवली होती. 

मात्र, इस्रायल आणि अमेरिका यांच्याशी सुरू असलेल्या संघर्षाच्या काळात कानी अनेकदा बेपत्ता झाले होते. सप्टेंबर 2024 मध्ये बेरुतमध्ये झालेल्या इस्रायली हल्ल्यातही त्यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा उडाल्या होत्या, पण काही दिवसांनी ते पुन्हा सार्वजनिक जीवनात परतले होते. हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह यांना लक्ष्य करण्यात आलेल्या हल्ल्यातूनही कानी वाचले होते, ज्यामुळे इराणच्या मनात त्यांच्याबद्दल अविश्वासाची भिंत उभी राहिली होती.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com