स्वित्झर्लंडमधील लेक लुसर्न येथे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या ऐतिहासिक राजनैतिक चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी एक खुलासा केला आहे. जागतिक शांतता आणि मध्यपूर्वेतील स्थैर्यासाठी सुरू असलेल्या या उच्चस्तरीय वाटाघाटींच्या दरम्यान व्हान्स यांनी त्यांच्या आयुष्यातील दोन "आवडत्या" भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तींची नावे जाहीर केली. यामध्ये एक त्यांची पत्नी उषा व्हान्स (Usha Vance) आणि दुसरे पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) आहेत. लक्झरी रिसॉर्टमधील वाटाघाटींच्या कक्षात बोलताना जेडी व्हान्स यांनी तेथे उपस्थित असलेल्या असीम मुनीर यांचे भरभरून कौतुक केले.
'या' दोन व्यक्तींशिवाय माझे आयुष्य अपूर्ण
जेडी व्हान्स यांनी राजनैतिक पथकांसमोर बोलताना सांगितले, "जेव्हापासून इस्लामाबादमध्ये पंतप्रधान आणि फील्ड मार्शल मुनीर यांनी आमचे स्वागत केले, तेव्हापासून मी नेहमी सांगतो की माझ्या आयुष्यात दोन अतिशय महत्त्वाचे लोक आहेत. एक भारतीय आणि एक पाकिस्तानी. ती भारतीय व्यक्ती माझी पत्नी (उषा व्हान्स) आहे आणि पाकिस्तानी व्यक्ती फील्ड मार्शल मुनीर आहेत."
व्हान्स यांनी पुढे उघड केले की, गेल्या 3 महिन्यांत त्यांनी इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा फील्ड मार्शल मुनीर यांच्याशी सर्वाधिक चर्चा केली आहे. "त्यांच्या राजनैतिक कौशल्याशिवाय मी आज येथे पोहोचू शकलो नसतो. ते एक उत्तम लष्करी नेते तर आहेतच, पण त्यांनी स्वतःला एक उत्कृष्ट मुत्सद्दी म्हणूनही सिद्ध केले आहे," अशा शब्दांत व्हान्स यांनी मुनीर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
अमेरिका-इराण संघर्षावर राजनैतिक तोडगा
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या इलेक्ट्रॉनिक अंतरिम कराराचा संदर्भ देत व्हान्स यांनी सांगितले की, वॉशिंग्टन या महिन्याभराच्या संघर्षावर राजनैतिक तोडगा काढण्यात यशस्वी ठरले आहे. या परिषदेला 'लेक लुसर्न समिट' असे नाव देण्यात आले आहे.
या ऐतिहासिक बैठकीत पाकिस्तान आणि कतार हे देश मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. मध्यपूर्वेतील अस्थिरता दूर करून शांतता प्रस्थापित करणे आणि 'स्ट्रेट ऑफ हार्मुझ'मधून (Strait of Hormuz) तेलाचा पुरवठा विनाअडथळा सुरू ठेवणे, हे या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world