कुवेतमधील मंगाफ शहरात बुधवारी (12 जून) कामगारांचे वास्तव्य असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये 40 भारतीयांसह एकूण 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता ही घटना घडली. 'कुवेत टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, सहा मजली इमारतीच्या तळमजल्यावरील स्वयंपाकघरामध्ये अचानक आग लागली. किचनमधील सिलिंडर फुटल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. काळी वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. 'एनडीटीव्ही'ने कुवेत अग्निशमन विभागाचे लेफ्टनंट कर्नल अली यांच्याशी संवाद साधला, त्यावेळेस कर्नल अली यांनी आग कशी लागली आणि काही वेळातच भडका कसा उडाला? याबाबतची माहिती सांगितली.
कुवेत अग्निशमन विभागाचे लेफ्टनंट कर्नल अली म्हणाले की, "या इमारतीत 160 हून अधिक मजूर राहत होते. त्यामध्ये अधिकतर भारतीयांचा समावेश होता. तसेच काही पाकिस्तानी आणि बांगलादेशी मजूरही येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण एकाच कंपनीत काम करतात. आगीत आतापर्यंत 45 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे".
(नक्की वाचा: कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; 40 भारतीय कामगारांचा मृत्यू, 50 जखमी)
आग वेगाने पसरली, मजुरांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही
लेफ्टनंट कर्नल अली पुढे असेही म्हणाले की, "आग खूप वेगाने पसरली. मजुरांना इमारतीबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. ते पूर्णपणे इमारतीत अडकले होते. आपत्कालीन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. अपघातात 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कुवेत सरकार जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे".
दरम्यान भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेचे उपायही अवलंबले जात आहेत, असेही लेफ्टनंट कर्नल अली यांनी सांगितले.
(नक्की वाचा- डोंबिवलीत पुन्हा स्फोट, MIDCतील कारखान्यात भीषण अग्नितांडव)
भारतीय दुतावासाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
भारतीय दुतावासाने X वर पोस्ट करत म्हटले की, "भारतीय कामगारांशी संबंधित आगीच्या दुर्घटनेशी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी दुतावासाने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +965-65505246 सुरू केला आहे. संबंधितांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधवा. दूतावास सर्वतोपरी मदत करेल."
'काही लोक बेकायदेशीररित्या राहत होते'
या इमारतीत अनेक लोक बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती गृहमंत्री शेख फहाद अल-युसूफ यांनी सांगितली. त्यामुळेच आग लागल्यानंतर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. या गोंधळामध्ये अनेक लोक इमारतीतच अडकले. गुदमरल्याने अनेकांचा बळी गेला. मृत्युमुखी पडलेल्यांबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
NBTC समुहाची होती इमारत
मल्याळी मीडिया 'ऑनमनोरमा'ने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीमध्ये राहणारे भारतीय कामगार केरळ आणि तामिळनाडूमधील रहिवासी होते. ही इमारत बांधकाम क्षेत्रातील कंपनी एनबीटीसी समुहाची होती. या इमारतीचे मालक मल्याळी व्यापारी के.जी. अब्राहम आहेत. के.जी. अब्राहम हे केरळमधील तिरुवल्ला येथील व्यापारी आहेत.