Mexico Protest : मेक्सिकोत वाढत्या पर्यटकांविरोधात आंदोलन, अमेरिकन पर्यटक टार्गेटवर; का केला जातोय विरोध?

मेक्सिकोमध्ये नागरिकांनी केलेलं आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनानं काही वेळानं हिंसक रुप घेतलं. हे आंदोलन करण्यात आलं ते मेक्सिकोमध्ये होत असलेल्या अतिपर्यटनामुळे. पर्यटकांमुळे मेक्सिकोच्या संस्कृतीला धक्का बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins

मेक्सिकोमध्ये नागरिकांनी केलेलं आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनानं काही वेळानं हिंसक रुप घेतलं. हे आंदोलन करण्यात आलं ते मेक्सिकोमध्ये होत असलेल्या अतिपर्यटनामुळे. पर्यटकांमुळे मेक्सिकोच्या संस्कृतीला धक्का बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यांचा राग हा विशेषतः अमेरिकन पर्यटकांविरोधात आहेत. त्यांनी मेक्सिकोतून बाहेर पडावं अशी मागणी मेक्सिकन नागरिकांनी केली आहे. गेल्या महिन्यात युरोपमधील स्पेनमध्येही पर्यटकांविरोधात असचं उग्र आंदोलन करण्यात आलं होतं. तेच लोण आता मेक्सिकोमध्येही पोहोचताना दिसतंय. पर्यटन हे अर्थव्यवस्थेच्या वाढीला पोषक मानलं जात असताना नागरिकांना मात्र हे पर्यटन का नकोय, पर्यटकांविरोधात इतका राग का पाहूया एक रिपोर्ट....

मेक्सिकोमधील मेक्सिको सिटी शहरात शुक्रवारी आंदोलनानिमित्तानं हजारो मेक्सिकन नागरिक रस्त्यावर उतरले होते. सुरुवातीला शांततेनं सुरू झालेलं हे आंदोलन अचानक हिंसक झालं. मेक्सिको सिटीमध्ये अतिपर्यटन आणि मेक्सिकन संस्कृतीवरील आक्रमणाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी अचानक दुकानांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. अगदी पर्यटकांशी वादावादीचे प्रकारही आंदोलनादरम्यान घडले. कोंडेसा आणि रोमासारख्या पर्यटकांच्या आवडत्या परिसरातही आंदोलनाचं हे लोण पोहोचलं. तिथंही लहानसहान उद्योगधंदे आणि दुकानांची नासधूस करण्यात आली. पर्यटकांच्या अंगावर धावून जाण्याचेही प्रकार घडले. काही दुकानांच्या काचांवर पेंटनं काही चिथावणीखोर संदेशही लिहिण्यात आले. मेक्सिकोमधून निघून जा अशा आशयाचे संदेश जिथे तिथे लिहिण्यात आले होते. मेक्सिकोमध्ये पर्यटनात अति वाढ झाल्यामुळे घरांच्या किंमती वाढू लागल्यात, स्थानिकांनाही घरं मिळेनाशी झाली आहेत. पर्यटक अनेकदा एअरबीएनबी सारख्या स्वस्त निवासी सोयींना प्राधान्य देतात. त्यामुळे मेक्सिकोमध्ये महत्त्वाच्या पर्यटन शहरांमध्ये स्थानिकांना घरं मिळेनाशी झाली आहेत. शिवाय अमेरिकेतून येणारे अनेक पर्यटक मेक्सिकोमध्ये अनेक दिवस ठाण मांडून बसतात आणि मेक्सिकन संस्कृतीवर घाला घालतात असा ही आरोप कऱण्यात येत आहे. त्यामुळे मेक्सिकोतील अमेरिकन दूतावासाबाहेरही आंदोलन करण्यात आलं. 

Advertisement

नक्की वाचा - देशाचे गुन्हेगार लंडनमध्ये एकत्र! विजय माल्या आणि ललित मोदींनी पार्टीत म्हंटलं गाणं, पाहा Video

इथल्या नागरिकांचा मूळ राग आहे तो त्यांच्या शहरांचा पर्यटकांच्या दृष्टीकोनातून होणारा विकास. एकप्रकारे त्यांच्या शहरांचा विकास करताना धनदांडग्या पर्यटकांच्या मनाप्रमाणे होतोय असा इथल्या नागरिकांचा आरोप आहे. जेन्ट्रिफिकेशन अर्थात वस्तीविकास किंवा उपनगरांच्या पुनरुज्जीवनाच्या नावाखाली मूळ मेक्सिकन संस्कृतीवर घाला घातला जात असल्याचा आरोप होत आहे. जेन्ट्री म्हणजे जमीनदार किंवा सामाजिक वजन असणारा गट. अशा वर्गासाठी खास वसाहत निर्माण करणं म्हणजे जेन्ट्रिफिकेशन. अशा वर्गाला शहरात खास जागा करून देणं याद्वारे गरीब, मागासलेल्या परिसराचा विकास असा उद्देश आहे. थोडक्यात त्या शहराचा सामाजिक, आर्थिक सांस्कृतिक कायापालट केला जातो. मात्र त्यामुळे शहरातील घरांचे दर वाढतात. श्रमिक, कामगारवर्ग त्या शहरातून बाहेर फेकला जातो. श्रीमंतांसाठी वसवलेल्या सोयीसुविधा श्रमिकांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यांची वस्ती असलेली जमीन श्रीमंतांसाठी विकत घेतली जाते. तिथं टुमदार शहर विकसित केलं जातं, अशा शहरांमध्ये विकास होतो, मात्र महागाई वाढते

Advertisement

काही दिवसांपूर्वीच मेक्सिकन संस्कृतीत खास स्थान असलेले काही खेळ हद्दपार करण्यासाठी कायदे करण्यात आले होते. त्यालाही मेक्सिकन नागरिकांनी विरोध केला. यात कोंबड्यांची झुंज, बैलांची झुंज यात प्राण्यांना हानी पोहोचवली जाते, असा दावा प्राणीमित्रांनी केला. आणि त्यानंतर मेक्सिको सिटी मध्ये याविरोधात कायदे करण्यात आले. हा देखील एक प्रकारे मेक्सिकन संस्कृतीवर घाला आहे असं सांगत मेक्सिकन नागरिक रस्त्यावर उतरले आणि या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. या खेळांवर मेक्सिकन स्थानिक अर्थव्यवस्थाही अवलंबून असते. आणि खेळांवर बंदी घालणाऱ्या कायद्यांमुळे या अर्थव्यवस्थेला ही फटका बसू शकतो

Advertisement

दरम्यान, शुक्रवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. विशेषतः अमेरिकन दूतावासाबाहेर पोलिसांची वाहनं तैनात होती. तिथंही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला. २०२०पासून मेक्सिकोमध्ये अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल वाढलीय. 2020 मध्ये कोरोनाकाळातील निर्बंध टाळण्यासाठी आणि स्वस्तातली घरं मिळवण्याच्या दृष्टीनं अनेक अमेरिकन आयटी व्यावसायिकांनी मेक्सिकोमध्ये जम बसवला होता. त्यानंतर इथं घरांच्या किंमती वाढल्या आणि स्थानिकांना घरं मिळेनाशी झाली असा आरोप होतोय. तर ट्रम्प सत्तेत आल्यानंतर तिथं मेक्सिकोमधील अनेक नागरिकांना अवैध स्थलांतराच्या आरोपांखाली मेक्सिकोमध्ये धाडलं जातंय. याचाही राग मेक्सिकन नागरिकांच्या मनात आहेच

पर्यटनाविरोधात युरोपमध्येही वातावरण तापू लागलंय. अशीच काहीशी स्थिती गेल्या महिन्यात स्पेनमध्येही दिसून आली होती. तिथंही अति पर्यटनामुळे महागाई वाढतेय. घरांच्या किंमती वाढल्यात. त्यामुळे स्थानिकांनाच घरं मिळेनाशी झाली आहेत. स्पेनच्या बार्सिलोनामध्ये तर गेल्या वर्षीपासूनच ही पर्यटनविरोधी आंदोलनांना पेव फुटलंय. आंदोलनादरम्यान थेट पर्यटकांनाच लक्ष्य केलं जातं. तिथं पर्यटकांवर पाण्याच्या पिचकाऱ्या उडवल्या जातात
पर्यटनाच्या आड महागाई वाढत असल्याचा आरोप होतोय. हेच मेक्सिकोमध्येही दिसून येतंय. त्यामुळे युरोपनंतर आता मेक्सिकोमधलं वातावरणही पर्यटनासाठी दुषित होऊ लागलंय.