Pulwama attack mastermind dead: पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या आणि भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांची आता एकामागून एक शिकार होत आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गेल्या 2 वर्षात पाकिस्तानच्या सुरक्षित आश्रयाखाली राहणाऱ्या 20 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा अशाच प्रकारे थरारक अंत झाला असून, या 'अज्ञात' हल्लेखोरांच्या दहशतीने दहशतवाद्यांच्या गोटात मोठा हाहाकार माजला आहे.
अज्ञात हल्लेखोर आणि सारखाच पॅटर्न
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या हत्यांचा पॅटर्न सर्वांनाच कोड्यात टाकणारा आहे. भररस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी अज्ञात हल्लेखोर येतात, दहशतवाद्यांवर गोळ्या झाडतात आणि पसार होतात. मुजफ्फराबादमध्ये हमजा बुरहानवर झालेला गोळीबारही याच पद्धतीचा होता. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व दहशतवादी भारतामध्ये झालेल्या मोठ्या हल्ल्यांमधील मुख्य आरोपी किंवा मास्टरमाइंड होते. पाकिस्तान सरकारने या हत्यांबाबत मौन बाळगले असले तरी, यामुळे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांचे कंबरडे मोडले आहे.
( नक्की वाचा : Bermuda Triangle: बर्म्युडा ट्रँगलचं सर्वात मोठं गूढ उकललं? समुद्राच्या खाली शास्त्रज्ञांना सापडलं तरी काय? )
ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवाद्यांचे तुटलेले मनोधैर्य
दहशतवाद्यांच्या या हत्यांमागे एक मोठे सत्र सुरू असल्याचे दिसते. ऑपरेशन सिंदूरनंतर या संघटनांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले आहे. त्यांच्या नेत्यांची आणि मुख्य हस्तकांची हत्या झाल्यामुळे या संघटनांना पुन्हा संघटित होणे कठीण झाले आहे. या दहशतीमुळे नवीन तरुणांची या संघटनांमध्ये सामील होण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. हमजा बुरहान सारख्या दहशतवाद्यांना भारत सरकारने 2022 मध्येच दहशतवादी घोषित केले होते, त्याचा अखेर पाकिस्तानमध्येच अंत झाला आहे.
पुलवामा हल्ल्याची पार्श्वभूमी
हमजा बुरहान ज्या पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार होता, तो भारतावरील सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक होता. 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या या क्रूर कृत्याचा बदला आता एकामागून एक दहशतवाद्यांचा खात्मा करून घेतला जात असल्याची चर्चा जगभरात आहे.
( नक्की वाचा : Meta Layoff 2026: पहाटे 4 वाजता मेल आला आणि नोकरी गेली; मेटा कंपनीने 8,000 जणांना एका झटक्यात काढले! कारण काय? )
पाकिस्तानमध्ये ठार झालेल्या प्रमुख दहशतवाद्यांची यादी
पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळात गोळ्या घालून ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची आणि आयएसआय एजंटची यादी खालीलप्रमाणे आहे:
फैजल नदीम उर्फ अबु कताल (लष्कर दहशतवादी) - मार्च 2025
मौलाना काशिफ अली (लष्कर-ए-तैयबा राजकीय शाखा प्रमुख) - फेब्रुवारी 2025
मुफ्ती शाह मीर (आयएसआय अंडरकवर एजंट) - मार्च 2025
रहीम उल्लाह तारिक (मसूद अजहरचा निकटवर्तीय) - नोव्हेंबर 2023
अकरम गाजी (लष्कर दहशतवादी) - नोव्हेंबर 2023
ख्वाजा शाहिद (लष्कर दहशतवादी) - नोव्हेंबर 2023
मौलाना जियाउर रहमान (लष्कर दहशतवादी) - सप्टेंबर 2023
कारी एजाज आबिद (मसूद अजहरचा निकटवर्तीय) - एप्रिल 2025
दाऊद मालिक (मसूद अजहरचा निकटवर्तीय) - ऑक्टोबर 2023
अदनान अहमद (लष्कर दहशतवादी) - डिसेंबर 2023
बशीर अहमद पीर (हिजबुल दहशतवादी) - फेब्रुवारी 2023
जहूर इब्राहिम (जैश दहशतवादी) - मार्च 2022
मेजर दानियाल (आयएसपीआर अधिकारी) - मार्च 2025
रियाज अहमद (लष्कर-ए-तैयबा दहशतवादी) - सप्टेंबर 2023
परमजीत सिंह पंजवार (खलिस्तानी दहशतवादी) - मे 2023