पाकिस्तानच्या क्वेटाहून पेशावरला जाणारी जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली होती. बलूचिस्तान लिबरेशन आर्मीच्या सदस्यांनी ही ट्रेन हायजॅक केली होती. पाकिस्तानी आर्मी आणि बलूचिस्तान लिबरेशन आर्मी यांच्यात जवळपास 30 तास चकमक झाली. त्यानंतर ट्रेनमध्ये अडकून बसलेल्या अनेकांना सोडवण्यात यश आलं. या ट्रेनमध्ये जवळपास 440 प्रवाशी होते. यावेळी झालेल्या चकमकीत 21 नागरीक, 4 जवान, आणि 33 दहशतवादी यात मारले गेले. मंगळवारी ही ट्रेन हायजॅक करण्यात आली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या हल्ल्यातून ट्रेनचे ड्रायव्हर अमजद हे सुखरूप वाचले. बलूची दहशतवाद्यांनी ट्रेनच्या इंजिन खाली स्फोटकं लावली होती. त्यामुळे रेल्वेचे डब्बे हे रुळा खाली उतरले. त्यामुळे रेल्वे थांबली. रेल्वे ज्या क्षणी थांबली त्याच वेळी बलूचिस्तान लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी रेल्वेवर हल्ला केला, असं अमजद सांगतात. या दहशतवाद्यांनी रेल्वेच्या खिडक्या तोडल्या. त्यानंतर गाडीत प्रवेश केला. त्यांनी गाडीत आल्यानंतर प्रवाशांना मारण्यास सुरूवात केली. काहींनी 27 तास खाली बसवून ठेवलं. त्यामुळे काही लोक शॉकमध्ये होते.
अमजद यांनी सांगितलं की अनेक जण रेल्वेत फसले होते. त्यांच्यासाठी तो कठीण काळ होता. दहशतवाद्यांनी प्रवाशांना त्यांच्या प्रांतानुसार वेगवेगळे केले. त्यात अर्सलान यूसुफ हे एक होते. त्यांनी सांगितलं की दहशतवादी पाकिस्तानी सैन्यातील लोकांना शोधत होते. त्या ट्रेनमध्ये अनेक सैनिक हे सुट्टीसाठी घरी निघाले होते. अशा सैनिकांना त्यांनी शोधून शोधून ठार मारले असं त्यांनी सांगितलं. मेहबूब अहमद यांनाही ओलीस ठेवण्यात आलं होतं. त्यांनाही गोळ्या लागल्या होत्या. पण ते नशिबवान म्हणून वाचले.
त्यांनी सांगितलं की त्यांच्या बरोबर काही प्रवाशांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. आपण दोन वेळा पळण्याचा प्रयत्न केला. त्यात काही जणांना पळता आलं. पण काही जणांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असं मेहबूब यांनी सांगितलं. आम्ही ही वाचणार नाही असं वाटत होतं. आम्ही अपेक्षा सोडली होती असंही त्यांनी सांगितलं. तर आणखी एक ओलीस ठेवलेले मुहम्मद तनवीर यांनी तर जिवंत राहात यावं यासाठी केवळ पाणीच दिलं जात होतं असं सांगितलं.
बलूचिस्तानमध्ये सध्या चीनच्या मार्फत मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. चीन मार्फत सुरु असलेल्या प्रकल्पांना बलूची बंडखोरांनी लक्ष्य केलं आहे. तर ट्रेनचे अपहरण होण्याची ही पहिलीच घटना आहे. जाफर एक्सप्रेसला मंगळवारी हायजॅक केलं गेलं होतं. त्यासाठी बंडखोरांनी रेल्वे ट्रॅकचा एक भाग स्फोटकांनी उडवला होता. त्यानंतर ही ट्रेन बलूचिस्तानच्या एका भागात रोखली गेली होती. हा भाग दुर्गम समजला जातो. इथं प्रवाशांना बंदी बनवण्यात आलं होत. शिवाय पाकिस्तानी सैन्या बरोबर ही या बंडखोरांनी दोन हात केले. यात 21 नागरिकांचा बळी गेला.