
महाविकास आघाडीत पहिली ठिणगी पडली होती ती निधी वाटपावरून. शिवसेनेच्या आमदारांना, मंत्र्यांना निधी दिला जात नाही अशी ओरड त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केली होती. त्यात भरत गोगावले हे आघाडीवर होती. अजित पवारांवर त्यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता नुकताच राज्याचा अर्थसंकल्प महायुतीकडून अजित पवारांनी सादर केला. यात ही शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देताना हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे. नगरविकास खात्याच्या निधीला ही कात्री लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावर मंत्री भरत गोगावले यांनी थेट प्रतिक्रीया दिली आहे. पण यावेळची त्यांची प्रतिक्रीया काहीशी मवाळ आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अर्थसंकल्पात अजित पवारांनी स्वत:च्या मंत्र्यांना सर्वाधिक निधी दिला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे मंत्री आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकाचा निधी दिला गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याला ही 10 हजार कोटींची कात्री लावण्यात आली आहे. यावर भरत गोगावले यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. निधीला काही कात्री लागली नाही. नियमाप्रमाणे जो रेषो आलाय, तो सगळ्यांना मिळाला आहे. निधीमध्ये थोडं वरखाली होतं. लाडक्या बहिणीला सांभाळून विकास निधी आमच्या वाट्याला आला आहे. सगळ्या विभागांना समान निधी मिळत नाही. अशी सारवासारव गोगावले यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती. पण या योजनेवरही पुली मारण्यात आली आहे. त्यावरही गोगावले यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. आनंदाचा शिधा यावर विचार विनिमय होत आहे. येणारा गणेशोत्सव, दिवाळी या सणांना जो काही शिधा द्यायचा असेल त्याला अजून वेळ आहे. त्यासाठी बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्याच्यावर आम्ही विचार करु. आनंदाचा शिधा चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं गोगावले यांनी सांगितलं. पण सांगताना ही योजना बंदी केली आहे. त्याला निधी नाही हेच अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केलं.
निधी मिळाला नाही म्हणून नाराज होणारे. अजित पवारांवर टीका करणारे हे भरत गोगावलेच होते. पण आता निधी कमी मिळाला आहे. शिवाय तिसऱ्या क्रमांकाचा निधी महायुतीत शिवसेनेला मिळाला आहे. तरही गोगावले आक्रमक झालेले दिसत नाही. मंत्री झाल्यानंतर त्यांच्यात झालेला हा बदल नजरेत येतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्हाला भरघोस निधी मिळाला. आता थोडा निधी मागे पुढे होईल. मात्र हा निधी पुढे कव्हर केला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टिका केली. जनतेने मतदानाच्या वेळी राऊत यांना ज्या काही शुभेच्छा द्यायच्या आहेत त्या दिल्या आहेत. त्यांनी असचं सतत बोलत रहावं. त्याचा आम्हाला नक्की फायदा होईल. ते आतापर्यंत जे काही बोलले त्याच्या नेमकं उलटं झालं आहे. शिंदेंचे सरकार पहिल्या दिवसापासून पडेल असं ते बोलत होते. पण सरकार पडलं नाही तर ते अधिक भक्कम झालं असंही गोगावले या निमित्ताने म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्यावर बोलणे टाळले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world