पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये गुरुवारी (8 मे 2025) ड्रोन हल्ले झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर चर्चिले जात होते. यामध्ये रावळपिंडीचाही समावेश होता. रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियम परिसरात ड्रोन आदळलं असून याच मैदानात गुरुवारी पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार होता. या ड्रोन हल्ल्यामुळे रावळपिंडी स्टेडियम परिसराचे मोठे नुकसान झाल्याचे कळते आहे. या हल्ल्यामुळे या मैदानात होणारा क्रिकेटचा सामना इतरत्र खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी पेशावर झालमी आणि कराची किंग्ज या संघांमध्ये सामना होणार होता. आता हा सामना दुसरीकडे खेळवण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या बातम्यांमध्ये तथ्य किती आहे याचा तत्काळ पत्ता लागणं कठीण जात आहे. यातील काही बातम्यांनुसार पाकिस्तानात विविध ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले आहेत. यातल्या काही सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की रावळपिंडी मैदानाशेजारी असलेल्या एका इमारतीवर ड्रोन आदळलं आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने हा सगळा परिसर सील केला आहे. हे ड्रोन कुठून आलंय, त्यात स्फोटकं होती का ? याचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यात दोनजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पाकिस्तान आता सुरक्षित राहिलेलं नसून पीएसएलमध्ये खेळण्यासाठी आलेल्या दोन क्रिकेटपटूंनी माघारी जाण्याची तयारी सुरू केली आहे. डेव्हिड विली आणि ख्रिस जॉर्डन या इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी परत जाण्यासाठी त्यांच्या टीमकडं परवानगी मागितली आहे. हे दोघंही मुलतान सुलतान या टीमचे खेळाडू आहेत.
पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये ड्रोनने हल्ले करण्यात येत आहेत. कराची लाहोरसह अनेक ठिकाणी ड्रोनहल्ले झाल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्ताननेच हा सगळा ड्रामा घडवून आणला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्यावर हल्ला झाला असे म्हणत आंतरराष्ट्रीय पातळीवर सहानुभूती मिळवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करू शकतो. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त फजिती झाली असून भारताने पाकिस्तानला जबरदस्तरित्या कोंडीत पकडले आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारताने उद्ध्वस्त केले आहेत. आपण दहशतवादाला अजिबात पोसत नाही असा दावा पाकिस्तानने केला होता, मात्र भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तो दावा किती खोटा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की लाहोर, गुजरांवाला, चकवाल, बहावलपूर, मियानो, कराची, छोर, रावळपिंडी आणि अटक इथे ड्रोन पाडण्यात आले आहेत. पाकिस्तानने दावा केला आहे की ड्रोन हल्ल्यात चार पाकिस्तानी जवान जखमी झाले आहेत. ड्रोन हल्ल्यात सिंध प्रांतातील मियानो इथे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
या ड्रोन हल्ल्यांमुळे पाकिस्तानी हवाई सुरक्षा यंत्रणेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. बुधवारी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यांचे शब्द हवेत विरण्याच्या आधीच ड्रोन हल्ल्यांमुळे त्यांचे हवाई दल किती सक्षम आहे हे जगाला कळालं आहे.