PM Modi Talk to Trump: गाझामध्ये शांततेसाठी झालेल्या ऐतिहासिक करारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणाबद्दल पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर एक पोस्ट केली.
त्यांनी लिहिले, "माझे मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले."
काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान मोदींनी या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "व्यापार वाटाघाटींमध्ये झालेल्या चांगल्या प्रगतीचाही आढावा घेतला. येत्या काही आठवड्यांत संपर्क कायम ठेवण्यावर सहमती झाली."
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पुढाकाराने इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी करार झाला आहे. या अंतर्गत, दोन्ही पक्षांनी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
( नक्की वाचा : Nobel Peace Prize: डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्ता कट! नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत कोण पुढे? वाचा सविस्तर )
यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पश्चिम आशियासाठी असलेल्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कराराचे गुरुवारी स्वागत केले होते. या करारानुसार इस्रायल आणि हमासने गाझामधील लढाई थांबवण्याचा निर्णय घेतला. मोदी म्हणाले की, हा करार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे देखील प्रतिबिंब आहे.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर लिहिले, "आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कराराचे स्वागत करतो. हे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचेही प्रतिबिंब आहे." ते पुढे म्हणाले, "आम्हाला आशा आहे की बंधकांची सुटका आणि गाझाच्या लोकांना मानवीय मदत मिळाल्याने त्यांना दिलासा मिळेल आणि कायमस्वरूपी शांततेचा मार्ग मोकळा होईल."
दोन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध थांबणार
ट्रम्प प्रशासनाने सादर केलेल्या करारानुसार, इस्रायल आणि हमास यांनी गाझामधील लढाई थांबवण्यावर आणि काही बंधक व कैद्यांना मुक्त करण्यावर सहमती दर्शविली आहे. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या विनाशकारी युद्धात गेल्या काही महिन्यांत मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे.