पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. युक्रेन दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे मोदी यांचा हा दौरा ऐतिहासिक मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वोलदिमीर झेलेन्स्की कीवमधील मार्टीरोलॉजिस्ट एक्स्पोझिशनमध्ये एकत्र दिसले. मोदी यांनी भेटीदरम्यान झेलेन्स्की यांच्याशी हस्तांदोलन केले आणि मिठी देखील मारली.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धादरम्यान दोन्ही नेत्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अवघ्या जगाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यावर आहे. रशिया-युक्रेन संघर्षावर वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करून दोन्ही नेते एकमेकांशी आणि शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत.
मोदी पोलंडमधून युक्रेनमध्ये पोहोचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोलंड आणि युक्रेन दौऱ्यावर आहेत. पोलंडचा दौरा आटोपून मोदी 'रेल फोर्स वन' ट्रेनमधून जवळपास 10 तासांचा प्रवास करुन कीव येथे पोहोचले. रशियाच्या दौऱ्यानंतर जवळपास 6 आठवड्यानंतर मोदी युक्रेन दौऱ्यावर आले आहेत. रशियाच्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत पीएम मोदी यांनी संघर्ष संपवण्यावर लक्ष केंद्रित करून विस्तृत चर्चा केली.
इटलीमध्ये मोदी-झेलेन्स्की भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेच्या वेळी झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. त्यावेळी भारत युक्रेनमधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत राहील आणि शांततेचा मार्गाद्वारे तोडका काढण्याचा प्रयत्न करेल, असं मोदी यांनी झेलेन्स्की यांना म्हटलं होतं. त्यावेळी युक्रेनच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदी यांना कीव येथे आमंत्रित केले होते.