Pune to Abu Dhabi Flights : पुणेकरांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता थेट अबु धाबी गाठता येणार आहे. डिसेंबर महिन्यापासून ही विमानसेवा सुरू होणार असल्याने अवघ्या काही तासात पुणेकरांना अबु धाबी गाठता येणार आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपनीने या नव्या हवाई मार्गाबाबत शनिवारी घोषणा केली. पुणे विमानतळावरून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी पुणे ते अबू धाबी विमान उड्डाण होणार आहे. २ डिसेंबरपासून पुणे ते अबू धाबी ही विमानसेवा सुरू होणार आहे.
पुण्याहून किती वेळात गाठता येणार अबुधाबी?
पुण्यातून रात्री ८.५० वाजता विमानाचे उड्डाण होईल आणि अबु धाबी येथे रात्री १०.४५ वाजता पोहोचेल. म्हणजे १.५५ मिनिटात पुण्याहून अबुधाबी गाठता येणार आहे. याशिवाय परतीच्या प्रवासाचं विमान रात्री ११.४५ वाजता अबु धाबीहून निघेल आणि पहाटे ४.१५ वाजता (४ तास ३० मिनिटं) पुण्यात उतरेल, असे एअर इंडियाने एक्सप्रेस कंपनीने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा - पुणे-छत्रपती संभाजीनगर 8 तासांचा प्रवास 3 तासांवर येणार; 'या' शहरांना होणार मोठा फायदा
तिकीट दर किती असेल?
मेक माय ट्रिपच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, २ डिसेंबरला पुण्याहून रात्री ८.५० वाजता सुटणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचं तिकीट ८,९३९ रुपयांपासून (One Way trip) सुरू होईल. हे तिकीट १०,९३९ रुपये असून या तिकीटावर दोन हजार रुपयांची सवलत दिल्यामुळे हे तिकीट ८,९३९ रुपयांना खरेदी करता येईल. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पुणे ते अबुधाबी विमान तिकीटाचे दर १० ते ११ हजारांपर्यंत असेल. मात्र नववर्ष सेलिब्रेशनमुळे तिसऱ्या आठवड्यापासून तिकीट दरात वाढ पाहायला मिळत आहे. ३१ डिसेंबर रोजी हेच तिकीट १६,२७६ पर्यंत गेल्याचं संकेतस्थळावरुन दिसून येत आहे.
अबुधाबीमधील फिरण्याची ठिकाणं...
अबुधाबी हे युएईमधील एक प्रसिद्ध शहर आहे. या शहरात जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यामध्ये शेख जायद ग्रँड मशीद, फेरारी वर्ल्ड, वॉर्नर ब्रदर्स वर्ल्ड आणि लुवर अबु धाबी यासारखी लोकप्रिय ठिकाणं आहेत. याशिवाय अबु धाबी जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या ठिकाणांपैकी एक आहे.