Arjuna Ranatunga to be Arrested: श्रीलंकेचे विश्वचषक विजेते कर्णधार आणि श्रीलंका सरकारचे माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पेट्रोलियम मंत्री असताना केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिले आहे.
नेमके काय आहेत आरोप?
एका भ्रष्टाचारविरोधी संस्थेने हे प्रकरण उघड केले असून रणतुंगा आणि त्यांचे बंधू यांच्यावर दीर्घकालीन तेल खरेदी कराराची प्रक्रिया बदलून स्पॉट खरेदी अधिक जास्त दरात केल्याचा आरोप आहे. लाचलुचपत किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये झालेल्या 27 खरेदी व्यवहारांमुळे एकूण नुकसान अंदाजे 80 कोटी इतके आहे.
अटक आणि पुढील कार्यवाही
आयोगाने कोलंबो दंडाधिकारी असंका बोदरागामा यांना कळवले की, अर्जुन रणतुंगा सध्या देशाबाहेर आहेत आणि ते देशात परत येताच त्यांना अटक केली जाईल. अर्जुन रणतुंगा यांचे मोठे बंधू धम्मिका रणतुंगा जे तत्कालीन सरकारी मालकीच्या सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते, त्यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
(नक्की वाचा- IPL 2026 Auction : 170 च्या स्ट्राइक रेटचा बॅटर, जडेजाचा संभाव्य वारसदार! 5 Uncapped प्लेयर्सवर पैशांचा पाऊस !)
धम्मिका रणतुंगा श्रीलंका आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिक आहेत. दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर देशाबाहेर प्रवास करण्यास बंदी घातली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 मार्च 2026 रोजी होणार आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
भ्रष्टाचारविरोधी मोहिम
रणतुंगा आणि त्यांच्या भावावरील हा खटला अनिल कुमार दिसानेयके यांच्या नेतृत्वाखालील 2024 मध्ये सत्तेत आलेल्या वर्तमान सरकारने सुरू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेशी संबंधित आहे. सरकारने सत्तेवर येताना देशातील स्थानिक भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी, रणतुंगा यांचे दुसरे भाऊ, प्रसन्ना रणतुंगा, जे माजी पर्यटन मंत्री होते, त्यांनाही विमा फसवणूक प्रकरणी अटक झाली होती. खंडणी प्रकरणात ते जून 2022 मध्ये दोषी ठरले होते.
कोण आहेत अर्जुन रणतुंगा?
62 वर्षीय रणतुंगा हे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अत्यंत लोकप्रिय डावखुरे फलंदाज होते. त्यांचे सर्वात मोठे यश म्हणजे त्यांच्या नेतृत्वात 1996 मध्ये श्रीलंकेने क्रिकेट विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. रणतुंगा यांनी 93 कसोटी आणि 269 एकदिवसीय सामने खेळले. दोन्ही फॉरमॅटमध्ये त्यांनी 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने इंग्लंडमध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती.