Strait of Hormuz Closed: इस्रायलने लेबनॉनमध्ये इराणच्या हिजबुल्ला मिलिटंट्स ग्रुपवर हवाई हल्ला केल्यानंतर इराणने बुधवारी (8 एप्रिल) होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे. दरम्यान अमेरिकेने जागतिक तेल वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा जलमार्ग तातडीने खुला करण्याची मागणी इराणकडे केली आहे. लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात झालेला युद्धविराम करार टिकणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नष्ट करण्याचा इशारा शेवटच्या क्षणी मागे घेतल्यावर इराण, अमेरिका आणि इस्रायल बुधवारी दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत झाले होते. पण या कराराची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इस्रायलने कोणतीही पूर्वसूचना न देता मध्य बैरूतच्या दाट लोकवस्ती असलेल्या निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांवर हवाई हल्ले केले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, या हल्ल्यांमध्ये किमान 112 लोकांचा मृत्यू झाला असून 800 हून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्याने 10 मिनिटांच्या कालावधीत मध्य बैरूत, दक्षिण लेबनॉन आणि पूर्व बेका खोऱ्यातील हिजबुल्लाच्या 100 हून अधिक ठिकाणं लक्ष्य करत हल्ला केला आणि या कारवाईला सध्याच्या युद्धातील सर्वात मोठा हल्ला म्हटले जात आहे.
होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा बंद
इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर म्हटले की, इराणसोबत झालेला युद्धविराम करार लेबनॉनमधील तेहरान समर्थित हिजबुल्ला गटासोबतच्या त्यांच्या लढाईला लागू होत नाही. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, हिजबुल्लामुळे लेबनॉनला या करारात समाविष्ट केलेले नाही. लेबनॉनवरील ताज्या हल्ल्यांबाबत विचारले असता ते म्हणाले, "ती एक वेगळी लढाई आहे." दुसरीकडे करारात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानने पूर्वी म्हटले होते की, इराण युद्धातील दोन आठवड्यांच्या युद्धविरामांतर्गत इस्रायल आपले हल्ले थांबवेल. इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले की, लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांच्या निषेधार्थ तेहरानने होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. इराणचे निमलष्करी दल 'रिव्होल्युशनरी गार्ड'चे एयरोस्पेस कमांडर जनरल सैयद माजिद मूसावी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट केले की, "लेबनॉनविरोधातील आक्रमकता ही इराणवरील आक्रमकता आहे." त्यांनी सविस्तर माहिती न देता असा इशारा दिला की, इराणी सैन्य कठोर प्रत्युत्तराची तयारी करत आहे.

Photo Credit: AP PTI
आरोप-प्रत्यारोप
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, लेबनॉनमधील युद्धाचा अंत हा अमेरिकेसोबत झालेल्या युद्धविराम कराराचाच भाग आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटलंय की, "संपूर्ण जग लेबनॉनमधील नरसंहार पाहत आहे. आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे आणि ते आपल्या आश्वासनांची पूर्तता करतात का? याकडे जगाचे लक्ष आहे." इराणने अमेरिकेवर युद्धविराम करारातील तीन अटींचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला. यादरम्यान व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलीन लेविट यांनी सांगितले की, होर्मुजची सामुद्रधुनी बंद करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. त्यांनी हा जलमार्ग पुन्हा उघडण्याच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अपेक्षा आणि मागणीचा पुनरुच्चार केला. अमेरिका आणि इराण या दोघांनीही या युद्धविराम कराराला स्वतःचा विजय म्हटले आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायली सैन्याने महत्त्वपूर्ण लष्करी विजय मिळवला असून इराणी सैन्य आता अमेरिकेसाठी किंवा या क्षेत्रासाठी कोणताही मोठा धोका राहिलेले नाही.
(नक्की वाचा: US-Iran Ceasefire: हजारो नागरिक रस्त्यावर, अल्लाहू अकबरचे नारे, युद्धविरामानंतर इराणमध्ये काय घडलं?)
जहाजांवरील शुल्क आणि अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अनिश्चिततादुसरीकडे इराणी सैन्याने दावा केला की, त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेला आपल्या प्रस्तावित अटी मान्य करण्यास आणि शरणागती पत्करण्यास भाग पाडले आहे. युद्धविराम कराराच्या अटींबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. इराणने म्हटले आहे की, या करारामुळे त्यांना होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याची नवीन व्यवस्था लागू करण्याची परवानगी मिळेल, पण इतर देश या अटीवर सहमत आहेत की नाही हे अद्याप समजलेले नाही. दरम्यान व्हाइट हाऊसने स्पष्ट केले की, ट्रम्प या शुल्काच्या विरोधात आहेत. इराणच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांचे भवितव्य अद्याप अनिश्चित आहे, जे नष्ट करणे अमेरिका आणि इस्रायलचे मुख्य उद्दिष्ट होते. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका इराणसोबत मिळून ते संवर्धित युरेनियम खोदून काढण्याचे काम करेल, जे गेल्या वर्षीच्या हल्ल्यात जमिनीत गाडले गेले होते. इराणने मात्र याला दुजोरा दिलेला नाही. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणच्या रस्त्यांवर सरकार समर्थकांनी अमेरिका मुर्दाबाद, इस्रायल मुर्दाबाद अशा घोषणा देत निदर्शनं केली.
(नक्की वाचा: ना ट्रम्प,ना शाहबाज ना जिनपिंग! युद्धबंदीसाठी 'या' नेत्याने पडद्यामागे फिरवली सूत्र, ठरला खरा 'पीसमेकर')
10-सूत्री योजना आणि सामुद्रधुनीतील संभाव्य तणावयुद्धविरामाच्या अटींबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आहेत. ट्रम्प यांनी सुरुवातीला इराणच्या 10-सूत्री योजनेचा उल्लेख केला होता, यामुळे 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याने सुरू झालेले युद्ध संपण्यास मदत होऊ शकते. पण जेव्हा इराणची बाजू समोर आली, तेव्हा ट्रम्प यांनी अधिक तपशील न देता त्याला एक फसवणूक म्हटले. इराणच्या बाजूनुसार, त्यांना युरेनियमचे संवर्धन सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल, जे अण्वस्त्रे बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ट्रम्प यांनी असेही सूचित केले की, अमेरिकेची युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपास तैनात राहतील, ज्यामधून शांततेच्या काळात एकूण तेल आणि नैसर्गिक वायू व्यापारापैकी 20 टक्के व्यापार होतो. येत्या काही दिवसांत हा तणावाचा एक संभाव्य स्रोत ठरू शकतो.

Photo Credit: AP PTI
भीषण जीवितहानीयुद्धाच्या भीषणतेचा विचार करता मार्च अखेरपर्यंत इराणमध्ये 1900 हून अधिक लोक मारले गेले आहेत. लेबनॉनमध्ये हिजबुल्ला विरुद्धच्या कारवाईत 1500 हून अधिक मृत्यू झाले असून 10 लाख लोक विस्थापित झाले आहेत. इस्रायलचे 23 नागरिक आणि 11 सैनिक, तर 13 अमेरिकन सैनिकांचाही या संघर्षात मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने म्हटले आहे की, युद्धाला कायमस्वरूपी पूर्णविराम देण्यासाठी शुक्रवारी (10 एप्रिल) इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू होऊ शकते. सध्या तेल उत्पादक देशांमध्ये आणि जागतिक बाजारपेठेत या घडामोडींमुळे अस्वस्थता आहे.
(Content Source PTI)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world