Hinduja Family: स्वित्झर्लंडमधील एका न्यायालयाने जिनिव्हा हवेलीतील भारतीय कर्मचाऱ्यांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हिंदुजा परिवारातील (Hinduja family) चार सदस्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी (21 जून) शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंदुजा कुटुंबातील सदस्यांना मानवी तस्करीच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले, पण अन्य आरोपांप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती 37 अब्ज पाऊंड इतकी आहे. पण कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे हे कुटुंब अडचणीत सापडले आहे. हिंदुजा कुटुंबाचा इतिहास काय आहे? या व्यापारी कुटुंबाचे भारताशी काय नाते आहे? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
जिनिव्हा येथील न्यायालयाने प्रकाश हिंदुजा आणि त्यांची पत्नी कमल हिंदुजा यांना चार वर्षे आणि सहा महिन्यांची शिक्षा सुनावलीय. तर त्यांचा मुलगा अजय आणि पत्नी नम्रता यांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतातून आणलेल्या कर्मचारी वर्गाचे शोषण केल्याप्रकरणी या कुटुंबास शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कर्मचारी स्वित्झर्लंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे पासपोर्ट जप्त केल्याचेही आरोप त्यांच्यावर आहेत.
(नक्की वाचा: पुतीन यांनी किम जोंगला दिली लग्झरी कार, हुकुमशाहनं दिलं खास रिटर्न गिफ्ट!)
परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी मुंबईतून घेतले होते व्यापाराचे धडे
हिंदुजा कुटुंब हे व्यापारी कुटुंब आहे. परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी 1914 मध्ये हिंदुजा समूहाची पायाभरणी केली. असे म्हणतात की परमानंद दीपचंद हिंदुजा यांचा जन्म भारताच्या फाळणीपूर्वी शिकारपूर (सिंध) येथे झाला होता. हा परिसर आताच्या पाकिस्तानामध्ये आहे. वर्ष 1914 मध्ये ते मुंबईमध्ये आले. येथे त्यांनी व्यापाराचे धडे घेतले. हिंदुजा समूहाने 1919मध्ये इराणमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय कार्यालय उघडले. 1995पर्यंत हेच या समूहाचे मुख्यालय होते.
(नक्की वाचा: मक्केत 68 भारतीय हजयात्रेकरूंचा मृत्यू; तापमान 51.8 अंश सेल्सिअस अन् मृतांचा आकडा 600 पार)
1979नंतर हिंदुजा समूह युरोपमध्ये स्थलांतरित झाला. सुरुवातीच्या काळात हिंदुजा समूहाने प्रामुख्याने मर्चंट बँकिंग आणि ट्रेडिंगचा व्यवसाय करत होते. पुढे परमानंद दीपचंद हिंदुजा यांच्या श्रीचंद, गोपीचंद आणि प्रकाश या तीन मुलांनी हा व्यवसाय हाती घेतला आणि अनेक देशांमध्ये कंपनीचा विस्तार केला.
हिंदुजा समूह 1979 मध्ये इराणमधून ब्रिटनमध्ये पोहोचला
हिंदुजा कुटुंबाने 1979 मध्ये आपल्या समूहाचे मुख्यालय लंडनमध्ये स्थापन केले. या कुटुंबाचा असा दावा आहे की त्यांचा समूह विविध देशांमध्ये सुमारे 2 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. समूहाचे विद्यमान चेअरमन गोपीचंद यांनी मे 2023मध्ये पदभार स्वीकारला. ते ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचे म्हटले जाते.
मागील वर्षी श्रीचंद हिंदुजा यांचे निधन झाले. यानंतर त्यांचा धाकटा मुलगा गोपीचंद यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला. स्वित्झर्लंडमधील मानवी तस्करी प्रकरणात दोषी ठरलेल्या प्रकाश हिंदुजा यांनी मोनॅकोतील व्यवसाय आपल्या ताब्यात घेतला.
(नक्की वाचा: 165 मुलांचा बाप आहे 'हा' गणिताचा शिक्षक, सध्या 10 महिला आहेत गर्भवती, तरीही...)
हिंदुजा समूहाच्या अनेक कंपन्या
हिंदुजा समूहाच्या अनेक कंपन्या आहेत. यामध्ये हिंदुजा हाउसिंग फायनान्स लिमिटेड, अशोक लेलँड, स्विच मोबिलिटी, पीडी हिंदुजा हॉस्पिटल, हिंदुजा बँक, इंडसइंड बँक, हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड, जीओसीएल कॉर्पोरेशन लिमिटेड, गल्फ ऑइल इंटरनॅशनल लिमिटेड, क्वेकर-हॉटन इंटरनॅशनल लिमिटेड, हिंदुजा नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुजा रिन्यूएबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी कंपन्यांचा या समूहामध्ये समावेश आहे.
ब्रिटनमधील संपत्ती
हिंदुजा कुटुंबाची ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे. हिंदुजा ग्रुपचे लंडनमधील व्हाइट हॉलमध्ये रॅफल्स नावाचे हॉटेल आहे. हे हॉटेल ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीटच्या अगदी जवळ आहे. बकिंगहॅम पॅलेसच्या अगदी जवळ असलेल्या कार्लटन हाऊसचा एक भागही या समूहाकडे आहे. या इमारतीत अनेक कार्यालये, घरे इत्यादींचा समावेश आहे.
फोर्ब्सच्या यादीनुसार हिंदुजा कुटुंबाची एकूण संपत्ती 47 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या कुटुंबातील गोपी हिंदुजा ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेले हिंदुजा कुटुंब हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. फोर्ब्सनुसार हिंदुजा कुटुंब 2022मध्ये जगातील 146वे सर्वात श्रीमंत कुटुंब होते.
कर्मचाऱ्यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी वेतन दिले जाते
दरम्यान हिंदुजा कुटुंबातील चार जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की हिंदुजा समूह आपल्या कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगार देतात आणि त्यांना स्वातंत्र्यही कमी प्रमाणात दिले जाते.
हिंदुजा यांनी आपल्यावर आरोप करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांसोबत न्यायालयाबाहेर गोपनीय तडजोड केल्याचेही म्हटले जात आहे. पण आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन फिर्यादीने खटला चालवण्याचा निर्णय घेतला.