Unopened Doors In The World: माणसाची उत्सुकता आणि विज्ञानाची ताकद यांच्यासमोर निसर्ग आणि इतिहासाने नेहमीच हार मानली आहे, असं म्हटलं जातं. पण जगाच्या नकाशावर असे काही दरवाजे, तळघरे आणि तिजोऱ्या आहेत, जिथे पोहोचल्यावर आधुनिक तंत्रज्ञान आणि महासत्तांचे पायही थबकतात. भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या एका मंदिराचा सातवा दरवाजा असो किंवा चीनच्या जमिनीखाली गाडलं गेलेलं एका सम्राटाचं साम्राज्य या अशा जागा आहेत, ज्या आजही पूर्णपणे उघडता आलेल्या नाहीत. यामागे केवळ भूत-प्रेत किंवा प्राचीन शापांच्या कथा नाहीत, तर त्यामागे दडलं आहे प्राचीन इंजिनीअरिंगचं ते भयावह विज्ञान आणि सरकारची हतबलता. याच रहस्यांचा उलगडा करूया, ज्यांच्यासमोर आजचं आधुनिक विज्ञान नतमस्तक झालं आहे. सुरुवात आपल्या भारतापासूनच करूया.
1. पद्मनाभस्वामी मंदिराचे 'व्होल्ट बी': नागबंधम आणि हवेचा अदृश्य पहारा
केरळच्या तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या तिजोऱ्यांनी 2011 मध्ये संपूर्ण जगाचे डोळे विस्फारले. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली जेव्हा पाच दरवाजे उघडले गेले, तेव्हा तिथून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा खजिना बाहेर आला. यामुळे हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ठरले. पण खरा सस्पेन्स तेव्हा सुरू झाला, जेव्हा भारताचे माजी कॅग (CAG) विनोद राय यांची टीम 'व्होल्ट बी' म्हणजेच सातव्या दरवाजासमोर जाऊन उभी राहिली. हा दरवाजा आजही उघडता आलेला नाही.
मान्यता: या दरवाजाला ना कुलूप आहे ना कडी. असे मानले जाते की, प्राचीन काळी सिद्ध पुरुषांनी 'नाग पाशम' किंवा 'नाग बंधम' मंत्रांनी याला लॉक केले होते. त्रावणकोर राजपरिवार आणि पुरोहितांच्या मते, ज्याला 'गरुड मंत्राचा' शुद्ध उच्चार येतो, तोच हा दरवाजा उघडू शकतो. कोणत्याही मशीनने किंवा आधुनिक हत्याराने तो उघडण्याचा प्रयत्न केल्यास देशावर मोठे संकट येईल, अशी श्रद्धा आहे.
वैज्ञानिक सत्य: विज्ञानाच्या नजरेतून पाहिले तर हे रहस्य अधिकच रंजक वाटते. पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार, हे तळघर शतकानुशतके पूर्णपणे 'एअर-टाइट' आहे. इतका काळ हवा न मिळाल्यामुळे तिथे विषारी वायूंचा साठा झाला असण्याची शक्यता आहे. आधुनिक लाइफ-सपोर्ट सिस्टमशिवाय तिथे जाणे जीवघेणे ठरू शकते. तसेच लोकांच्या धार्मिक भावना आणि राजपरिवाराचे अधिकार लक्षात घेऊन सरकारही यात हस्तक्षेप करणे टाळते.
(नक्की वाचा : Parle G: शून्यातून विश्व कसं उभं करावं? 'पारले'च्या यशाचा हा थक्क करणारा इतिहास वाचायलाच हवा! )
2. चिन शिन हुआंगची कबर: पाऱ्याच्या नद्या आणि तंत्रज्ञानाची हतबलता
चीनच्या शीआनमध्ये 1974 मध्ये काही शेतकरी विहीर खोदत असताना त्यांना मातीच्या सैनिकांची एक मोठी फौज सापडली, जिला 'टेराकोटा आर्मी' म्हटले जाते. ही फौज चीनचे पहिले सम्राट चिन शिन हुआंग यांच्या मकबऱ्याच्या संरक्षणासाठी तयार केली होती. पण या शोधानंतर पाच दशके उलटली तरी चीन सरकारने सम्राटाची मुख्य कबर उघडण्याची हिंमत केलेली नाही.
प्राचीन सापळा: ऐतिहासिक नोंदींनुसार, सम्राटाला अमर व्हायची ओढ होती आणि तो पाऱ्याला (Mercury) एक जादुई द्रव मानायचा. त्याने आपल्या कबरीभोवती पाऱ्याच्या कृत्रिम नद्या आणि तलाव तयार केले होते. तसेच तिथे घुसखोरांना मारण्यासाठी ऑटोमॅटिक धनुष्यबाण बसवले होते.
विज्ञानाला भीती: जेव्हा वैज्ञानिकांनी रोबोटिक कॅमेरे आणि सॉईल टेस्टिंगचा वापर केला, तेव्हा कबरीच्या आसपासच्या मातीत पाऱ्याचे प्रमाण सामान्यपेक्षा शेकडो पटीने जास्त आढळले. दरवाजा उघडताच निघणारी विषारी वाफ माणसाचे फुफ्फुस आणि मज्जासंस्था काही क्षणात नष्ट करू शकते. दुसरे कारण म्हणजे, टेराकोटा सैनिक बाहेर काढल्यावर हवेच्या संपर्कात येताच त्यांचा रंग उडाला. सम्राटाच्या कबरीतील ऐतिहासिक ठेवा हवा लागताच नष्ट होऊ नये, असे चिनी वैज्ञानिकांना वाटते.
3. गिझाचा ग्रेट पिरामिड: 'क्वीन्स चेंबर'चा बंद रस्ता
इजिप्तच्या पिरामिडमधील राजा आणि राणीच्या कक्षात (किंग्स अँड क्वीन्स चेंबर) दोन अरुंद बोगदे आहेत, जे बाहेर कुठेच उघडत नाहीत. 1993 आणि 2002 मध्ये वैज्ञानिकांनी तिथे छोटे रोबोटिक कॅमेरे पाठवले. बोगद्याच्या शेवटी रोबोटला एका दगडाच्या दरवाजाने रोखले, ज्यावर तांब्याचे दोन पिन होते. जेव्हा ड्रिल करून कॅमेरा आत टाकला, तेव्हा समोर काही अंतरावर आणखी एक दगडाचा दरवाजा दिसला, जो आजपर्यंत उघडला गेलेला नाही.
वैज्ञानिक गोंधळ: या इंजिनीअरिंगमुळे वैज्ञानिक हैराण आहेत. हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यास पिरामिडच्या अंतर्गत संरचनेला धोका निर्माण होऊ शकतो. या गुप्त दरवाजांमागे नक्की काय लपवले आहे, हे आजही एक कोडं आहे.
4. तियाहुआनाकोचा 'सूर्य द्वार': पाषाण विज्ञानाचे न सुटलेले कोडे
बोलिवियातील एंडीज पर्वतावर 13,000 फूट उंचीवर 'तियाहुआनाको' हे प्राचीन शहर आहे. तिथे 'गेटवे ऑफ द सन' म्हणजेच सूर्य द्वार आहे. हे एकाच मोठ्या ग्रॅनाइट दगडापासून बनवलेले 10 टन वजनाचे प्रवेशद्वार आहे. यावर 48 रहस्यमयी आकृत्या कोरलेल्या आहेत. वैज्ञानिकांच्या मते, हे एक गुंतागुंतीचे खगोलीय आणि सौर कॅलेंडर आहे, जे ग्रहांच्या चालीची अचूक गणना करायचे.
विज्ञानाची माघार: कोणत्याही क्रेन किंवा लोखंडी हत्याराशिवाय इतक्या उंचीवर 10 टनाचा दगड इतक्या अचूकपणे कसा कापला गेला, याचे उत्तर भू-वैज्ञानिकांकडे नाही. हे स्ट्रक्चर अत्यंत नाजूक स्थितीत असल्याने बोलिविया सरकारने तिथे खोदकामावर बंदी घातली आहे.
( नक्की वाचा : Bermuda Triangle: बर्म्युडा ट्रँगलचं सर्वात मोठं गूढ उकललं? समुद्राच्या खाली शास्त्रज्ञांना सापडलं तरी काय? )
5. इजिप्तचा 'ग्रेट स्फिंक्स': पंजाखाली दडलेले रहस्य
इजिप्तमध्ये पिरामिडच्या समोर असलेल्या 'ग्रेट स्फिंक्स' मूर्तीच्या उजव्या पंजाखाली एक गुप्त खोली असल्याचा दावा काही इतिहासकार करतात, जिला 'हॉल ऑफ रेकॉर्ड्स' म्हटले जाते. असे मानले जाते की, तिथे मानवी सभ्यतेचा इतिहास आणि हरवलेल्या 'अटलांटिस' बेटाच्या तंत्रज्ञानाचे दस्तऐवज आहेत.
रोखण्याचे कारण: 1990 च्या दशकात राडारच्या सहाय्याने तपासणी केली असता, तिथे काही कक्ष असल्याची पुष्टी झाली. पण इजिप्तच्या
पुरातत्व विभागाने तिथे खोदकाम करण्यास मनाई केली आहे. ही मूर्ती चुनखडीची (Limestone) असल्याने खोदकामामुळे ती कोसळण्याची भीती आहे.
6. तेओतिहुआकान: मेक्सिकोच्या पिरामिडखाली पाऱ्याचा बोगदा
मेक्सिकोतील 'प्लम्ड सर्पेंट' पिरामिडखाली 2003 मध्ये एक गुप्त बोगदा सापडला, जो 1800 वर्षांपासून बंद होता. रोबोटिक कॅमेऱ्यांनी तपासणी केली असता तिथे मोठ्या प्रमाणात द्रव पारा (Liquid Mercury) पसरलेला दिसला. विषारी वातावरण आणि बोगदा कोसळण्याच्या धोक्यामुळे याचे शेवटचे दरवाजे आजही बंदच आहेत.
( नक्की वाचा : Cooling Tips : AC चं बिल झिरो होणार! गच्चीवरच्या या साध्या युक्तीने अख्खं घर राहील फ्रिजसारखं कूल )
7. स्वालबार्ड ग्लोबल सीड वॉल्ट: कयामतच्या दिवसाची तिजोरी
ही तिजोरी एखाद्या राजाने नाही, तर आधुनिक माणसाने बनवली आहे. आर्क्टिक महासागरातील एका बेटावर बर्फाच्या टेकड्यांखाली 400 फूट खोल ही तिजोरी आहे. याला 'डूम्सडे वॉल्ट' असेही म्हणतात. यात जगातील सर्व पिकांच्या बियांचा बॅकअप ठेवला आहे. जर कधी अणुयुद्ध किंवा मोठी महामारी आली आणि पृथ्वीवरचे सर्व संपले, तर इथून मानवी जीवन पुन्हा सुरू करता येईल.
या तिजोरीचे दरवाजे उघडण्याची परवानगी कोणालाही नाही. हे क्षेत्र लष्करी देखरेखीखाली आहे आणि हॅकिंग टाळण्यासाठी तिथे इंटरनेटही नाही. अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीतच आंतरराष्ट्रीय करारांतर्गत हे दरवाजे उघडले जाऊ शकतात.
थोडक्यात सांगायचे तर, प्राचीन काळचे इंजिनीअरिंग असो किंवा भविष्यासाठी केलेली आधुनिक तयारी, हे बंद दरवाजे आजही विज्ञानाला आव्हान देत उभे आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world