US citizenship Gold Card : जगभरात अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी वाट्टेल तो खटाटोप करण्यास ते तयार असतात. या सर्वांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांनी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे.
ट्रम्प सरकारच्या नव्या योजनेमुसार अमेरिकेचं नागरिकत्व विकत मिळणार आहे. अमेरिकन नागरिकत्वासाठीच्या गोल्ड कार्डची किंमत 5 मिलिअन डॉलर्स म्हणजेच 43 कोटी इतकी आहे. गोल्ड कार्ड हे ग्रीन कार्डचं प्रीमियम व्हर्जन असेल. गोल्ड कार्ड असणाऱ्यांना लवकर नागरिकत्व मिळेल. गोल्ड कार्ड असणाऱ्यांना विशेष अधिकार दिले जाणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले ट्रम्प?
आम्ही काहीतरी नवी करतोय..ते काहीतरी वेगळं असणार आहे. ते खूप चांगलं असणार आहे. आम्ही एक गोल्ड कार्ड विकणार आहोत. आपल्याकडे ग्रीन कार्ड आहे..हे नवं गोल्ड कार्ड आहे या कार्डची किंमत असणार आहे. या कार्डमुळे श्रीमंत लोकं आमच्या देशात येतील. ते यशस्वी असतील..ते इथे खर्च करतील..ते इथे लोकांना नोकऱ्या देतील. ही स्कीम अत्यंत यशस्वी ठरेल असा मला विश्वास आहे, असं ट्रम्प यांनी सांगितलं.
कोणत्या देशात नागरिकत्व विकत मिळतं?
नागरिकत्व विकत देण्याची पद्धत जगातल्या अनेक देशांत सर्रास वापरली जाते. त्यात कॅनडा, न्यूझीलंड, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया, पनामा, सर्विया, अँटिग्वा, सिंगापुर, मेसेडोनिया, पेरु अशा अनेक देशांमध्ये पैसे दिले की नागरिकत्व मिळतं. आता यात अमेरिकेचाही समावेश झालाय. पण या देशांपेक्षा अमेरिकचं नागरिकत्वाचं किंवा पासपोर्टची जगातली पत खूप मोठी आहे.
( नक्की वाचा : अंधारी कोठडी, 45 किलोमीटर पायी चालले, अमेरिकेत कसे पोहोचले? भारतीयांच्या 'डंकी' प्रवासाची थरारक कहाणी )
अमेरिकन पासपोर्टचं महत्त्व काय?
आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक अनय जोगळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा पासपोर्ट जगात सर्वात जास्त ताकदवान म्हणून ओळखला जातो. कारण, जवळपास 180 देश असे आहेत की तिथं तुम्ही अमेरिकेचा पासपोर्ट असेल तर व्हिसाशिवाय प्रवास करु शकता किंवा त्या देशात गेल्यावर तुम्हाला विमानतळावर व्हिसा मिळू शकतो.
अमेरिका हा जगातील सर्वात शक्तीशाली देश आहे. त्याचे जगातील अनेक देशांशी युरोपीयन देशांशी, विकसित देशांशी चांगले संबंध असल्यामुळे तसंच अनेक विकसनशील देशांना अमेरिका मदत करत असल्यानं तुमच्याकडे अमेरिकेचा पासपोर्ट असेल तर तुम्हाला विमानतळावर कमी प्रश्नांची सरबत्ती झेलायला लागू शकते. तुम्हाला त्या देशात मान मिळतो.
अमेरिका जगात सर्वात स्थिर देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तुमच्याकडं अमेरिकेचा पासपोर्ट असेल तर तुमची संपत्तीचं मुल्य हे वाढण्याची शक्यता असते. कारण, डॉलरचा भाव सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे अनेक जणांचं अमेरिकन पासपोर्ट हवा हे स्वप्न असंत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड काढण्याची घोषणा केली आहे. दुबईत मिळणाऱ्या गोल्डन व्हिसा प्रमाणेच हा प्रकार आहे. या कार्डमुळे ग्रीन कार्डचे सर्व फायदे मिळणार आहेत.तसंच अमेरिकेचे नागरिकत्व मिळणे देखील यामुळे सोपे जाणार आहे.
( नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांची Drill, Baby, Drill घोषणा काय आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होईल? )
ट्रम्प यांनी ही योजना का सुरु केली?
अमेरिकेत 43 कोटींची गुंतवणूक केली तर हे गोल्ड कार्ड मिळू शकेल. अर्थात संबंधित व्यक्तींची छाननी देखील होणार आहे. अमेरिकेच्या डोक्यावर सध्या मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. त्याचवेळी अमेरिकन सरकारला साडेतीन लाख ते चार लाख कोटी अमेरिकन डॉलर्सचे कर्ज कमी करायचे आहेत. त्याची भरपाई करण्यासाठी हा उपाय अमेरिकन प्रशासनानं केला आहे.
अमेरिकेत येण्याची जगभर मोठ्या प्रमाणात क्रेझ असते. जगातील सर्वोत्तम लोकांनी अमेरिकेत यावं. त्याच्यासाठी पैसे भरण्याची त्यांची तयारी असेल तर त्यांना नागरिकत्व दिलं तर अमेरिकेत गुंतवणूक होऊ शकते. हे लोकं अमेरिकेत रोजगार निर्माण करु शकतात. त्यामुळे या लोकांचं महत्त्व ओळखून अमेरिकेनं गोल्ड कार्ड देऊ केलं आहे, असं जोगळेकर यांनी सांगितलं.