
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद स्विकारल्यानंतर अवैध नागरिकांना देशातून परत पाठवण्याची मोहीम सुरु केली आहे. अमेरिकेतून भारतामध्ये परतलेल्या 104 भारतीयांनी ते तिथं कसं गेले याचा जीवघेणा अनुभव सांगितला आहे. अमेरिकेच्या लष्करी विमानातून अमृतसरमध्ये दाखल झालेल्या नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणासह देशातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांचा समावेश आहे.
आपण एजंटच्या जाळ्यात कसं अडकलो, अमेरिकेत जाण्यासाठी किती त्रास सहन केला हे सर्व सांगितलं आहे. भरपूर रक्कम दिल्यानंतरही अमेरिकेत कोणत्याही पेपर्सशिवाय त्यांना कसं नेण्यात आलं. लांबचे विमान, समुद्रातील जीवघेणा प्रवासापासून ते खडतर पर्वतांमधून 45 किलोमीटर प्रवास करण्यापर्यंतचा समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
42 लाख दिले पण व्हिसा मिळाला नाही
पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातल्या ताहली गावच्या हरविंदर सिंह यांनी सांगितलं की, एका एजंटनं त्यांना अमेरिकेतील वर्क व्हिसा देण्याचं वचन दिलं होतं. या कामाचे एजंटनं 42 लाख रुपये घेतले. पण, नंतर त्यानं शब्द फिरवला. एजंटनं शेवटच्या क्षणी व्हिसा दिला नाही. त्यानं मला इकडं-तिकडं फिरवलं. त्यानं मला दिल्लीहून कतार आणि नंतर ब्राझीलमध्ये विमानानं नेलं.
त्यांनी मीडियाला पुढे सांगितलं की, ब्राझीलमध्ये पोहचल्यानंतर पेरुला जाणाऱ्या विमानात पाठवण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. पण, असं कोणतंही विमान नव्हतं. त्यानंतर टॅक्सीमधून पुढील प्रवास सुरु झाला.
हरविंदर सिंहनं सांगितलं की पहाडी रस्त्यावरुन चालल्यानंतर त्यांना आणि अन्य त्यांच्यासोबत असलेल्या नागरिकांना एका छोट्या नावेत बसवण्यात आले. या नावेतून त्यांना मेक्सिकोच्या बॉर्डरवरील खोल समुद्रात सोडण्यात आलं. त्यांचा समुद्रातील प्रवास 9 तासांचा होता. पण, त्यावेळी त्यांची नाव पलटली. या अपघातामध्ये त्यांच्यासोबत असलेल्या एकाचा मृत्यू झाला. पनामाच्या जंगलात आणखी एकाचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रवास तुटपुंज्या भातावर जिवंत होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : अमेरिकेनं लष्करी विमानातून भारतीयांना का पाठवलं? जयशंकर यांचा राज्यसभेत मोठा खुलासा )
हरविंदर सिंह यांची पत्नी कुलजिंदर कौर यांनी पीटीआयला सांगितलं की, आमच्याकडं जे काही होतं ते आम्ही विकलं. आम्ही चांगल्या भविष्याच्या आशेनं एजंटला पैसा देण्यासाठी मोठ्या व्याजासह उधार घेतले होते. पण, एजंटनं आम्हाला धोका दिला. आता आमच्यावर मोठं कर्ज असून त्यांनी माझ्या नवऱ्याला परत पाठवलं आहे.
अंधाऱ्या कोठडीत ठेवलं
जालंधरमधील दारापूरच्या सुखपाल सिंह यांनीही त्यांना झालेल्या त्रासाचा अनुभव सांगितला.
या संपूर्ण प्रवासाचा कोणताही फायदा झाला नाही. कारण अमेरिकेची बॉर्डर पार करण्यापूर्वीच मेक्सिकोमध्ये त्यांना अटक करण्यात आले होते.
आम्हाला 14 दिवस एका अंधारी कोठडीत ठेवण्यात आले होते. आम्ही कधीही सूर्य पाहिला नाही. या परिस्थितीमध्ये हजारो पंजाबी तरुण, कुटुंब आणि मुलं अडकली आहेत. या संपूर्ण प्रकरणातून धडा घेऊन कुणीही चुकीच्या मार्गानं परदेशात जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world