मुंबई:
US Election 2024 : अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांची सरशी झाली आहे. ट्रम्प यांनी या निवडणुकीत विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष आणि डेमॉक्रेटीक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस (Kamala Harris) यांच्यावर निर्णायक आघाडी घेतलीय. ट्रम्प यापूर्वी 2016 ते 2020 दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यानंतर मागील निवडणुकीत जो बायडेन यांनी त्यांचा पराभव केला. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकत ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश केलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या विजयानंतर त्यांच्या समर्थकांना उद्देशून भाषण केलं. या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे पाहूया
- मी प्रत्येक नागरिक आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी संघर्ष करेन. मी दररोज, माझ्या शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी संघर्ष करेन, असं ट्रम्प यांनी सांगितलं.
- मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध अमेरिका होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. तुमची मुलं आणि तुमचा तो हक्क आहे, असं ट्रम्प यांनी सांगितलं. हा अमेरिकेसाठी सुवर्णकाळ असेल, असं ते म्हणाले.
- या प्रकारचा राजकीय विजय आपल्या देशानं कधीही पाहिला नाही, असं ट्रम्प यांनी सांगितलं. मी अमेरिकन नागरिकांचं त्यांनी मला 47 वा आणि 45 वा अध्यक्ष म्हणून निवडल्याबद्दल आभारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
- परमेश्वरानं काही खास उद्देशानं मला जीवदान दिलंय, असं ट्रम्प या भाषणात म्हणाले. अवैध इमीग्रेशनच्या मुद्यावरही त्यांनी थेट संदेश दिला. आम्ही आपल्या बॉर्डरचा प्रश्न सोडवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना सांगितलं, 'मी तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी काम करत राहीन. हा अमेरिकेचा सुवर्णकाळ असेल.'
- आपण सर्वजण मिळून अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवूया. नॉर्थ कॅरिलोना, जॉर्जिया, पेन्सलवेलिया आपण जिंकलं आहे. आपण अलास्का देखीाल जिंकत आहोत. आपण 315 पार जाणार, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, अमेरिकेला मलम आवश्यक आहे. या खोलीत मी तुमचं प्रेम अनुभव आहे. मी तुम्हाला आनंद आणि अभिमानाचे अनेक प्रसंग देईन.
- आपण अमेरिकेत ऐतिहासिक आणि भक्कम बहुमत मिळवलं आहे. आपलं सिनेटवरही वर्चस्व आहे, असं ट्रम्प यांनी सांगितलं.
- ट्रम्प यांनी त्यांच्या विजयी भाषणाच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबाचाही उल्लेख केला. त्यांनी त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं. या विजयाचं श्रेय पत्नी आणि मुलांनाही दिलं. ट्रम्पनं त्यांची सासू अमाल्या यांचीही आठवण काढली.
- ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात इलॉन मस्क यांचीही जोरदार प्रशंसा केली. एका नव्या स्टारचा जन्म झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. मस्क यांची स्पेस शिपचाही उल्लेख त्यांनी केला. हे काम चीन, रशियाला करणे शक्य नव्हते. अमेरिकेतही मस्कशिवाय कुणाला शक्य नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world