जाहिरात

US Iran Conflict : ट्रम्प यांची इराणला संपवण्याची धमकी अन् भारताची मोठी सूचना; पुढच्या 48 तासांत काय होणार?

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणमधील भारतीय दूतावास सतर्क झाले असून तिथे राहणाऱ्या भारतीयांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात  आली आहे.

US Iran Conflict : ट्रम्प यांची इराणला संपवण्याची धमकी अन् भारताची मोठी सूचना; पुढच्या 48 तासांत काय होणार?
Iran War : अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सातत्यानं हल्ले सुरु आहेत.
मुंबई:


US Iran Conflict : पश्चिम आशियात सुरु असलेल्या युद्धात पुढे काय होणार? या विचारानं सध्या संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अशा वळणावर पोहोचला आहे, जिथून परतीचे सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटत आहेत. इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले सुरू असतानाच इराणनेही जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. 

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या एका धमकीने संपूर्ण जगाचा श्वास रोखला आहे. ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणमधील भारतीय दूतावास सतर्क झाले असून तिथे राहणाऱ्या भारतीयांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना देण्यात  आली आहे.

इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांना भारतीय दूतावासाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, पुढचे 48 तास ते जिथे आहेत तिथेच त्यांनी राहावे. परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्याने कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

(नक्की वाचा : Iran War: इशारा, इमोशनल ब्लॅकमेल आणि'सीक्रेट कॉल'...खामेनींना मारण्यासाठी ट्रम्प यांचं मन कसं वळवलं? )

भारतीयांसाठी सुरक्षेची नियमावली

दूतावासाने जारी केलेल्या या एडव्हायझरीमध्ये भारतीयांना घराच्या आतच राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच सर्व पॉवर प्लांट, लष्करी तळ आणि बहुमजली इमारतींच्या वरच्या मजल्यांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हल्ल्याचा धोका लक्षात घेता मोकळ्या जागेत किंवा उंचावर राहणे धोक्याचे ठरू शकते, असे यात नमूद केले आहे. 

जे भारतीय दूतावासाने बुक केलेल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्यांनीही बाहेर न पडता दूतावासाच्या टीमसोबत सतत संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )

डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर एक पोस्ट टाकून खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज रात्री एक संपूर्ण संस्कृती संपुष्टात येईल, जी पुन्हा कधीही परत आणली जाऊ शकणार नाही. मला असे घडावे असे वाटत नाही, पण कदाचित तसेच होईल. जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा क्षण ठरेल आणि गेल्या 47 वर्षांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार आणि मृत्यूचा सिलसिला आज रात्री संपेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

मंगलवारची रात्र आणि निर्णायक डेडलाईन

होर्मुजची समुद्रधुनी खुली करण्यासाठी आणि करारासाठी इराणला दिलेली डेडलाईन संपायला आता अवघे काही तास उरले आहेत. ही मुदत संपण्यापूर्वीच ट्रम्प यांनी इराणला ही धमकी दिली आहे. याआधी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतही ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणला एका रात्रीत संपवले जाऊ शकते आणि ती रात्र मंगळवारची असू शकते. 

ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धाचे ढग गडद झाले असून, तिथे राहणाऱ्या हजारो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com