US-Iran War: इराणमध्ये 15 दिवसांसाठी युद्धविराम जाहीर झाला आहे. मात्र,त्याचवेळी जगात एक नवी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेचा केंद्रबिंदू आहे इराण. गेल्या 40 दिवसांपासून इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी सार्वजनिकरीत्या कुठेही दिसलेले नाहीत. त्यामुळे इराणमध्ये नक्की चाललंय काय, असा प्रश्न आता संपूर्ण जगाला पडला आहे. मोजतबा खरोखरच सत्ता सांभाळत आहेत की पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिजतंय, यावरून आता संशयाचे जाळे गडद होत चालले आहे.
सत्ता कुणाच्या हाती ?
'द टाइम्स'ने दिलेल्या एका खळबळजनक रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनी हे कोम शहरात उपचार घेत असून ते सध्या बेशुद्ध अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे, ते सत्तेशी संबंधित कोणत्याही निर्णयामध्ये सहभागी होऊ शकत नसल्याचा दावा एका डिप्लोमॅटिक मेमोमध्ये करण्यात आला आहे.
अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संस्थांच्या माहितीवर हा दावा आधारित आहे. ही माहिती खरी असेल, तर याचा अर्थ असा होतो की सध्या इराणमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मोजतबा यांच्या अनुपस्थितीत इराणमध्ये सध्या शॅडो लीडरशिप म्हणजेच पडद्यामागून सत्ता चालवली जात असल्याची जोरदार चर्चा आहे.
( नक्की वाचा : US Iran Conflict : ट्रम्प यांची इराणला संपवण्याची धमकी अन् भारताची मोठी सूचना; पुढच्या 48 तासांत काय होणार? )
सत्तासंघर्षातील तीन प्रमुख शक्ती
मोजतबा खामेनी सत्तेत सक्रिय नसल्याने आता तीन महत्त्वाच्या शक्ती इराणवर पकड मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये रिव्होल्युशनरी गार्ड (IRGC) ही लष्करी संघटना रणनीतिक निर्णयांवर लक्ष ठेवून आहे.
दुसरीकडे, सर्वोच्च नेत्याची निवड करणारी अॅसेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स ही धार्मिक परिषद सक्रिय झाली आहे. तसेच खामेनी कुटुंबातील अंतर्गत वर्तुळही सत्तेत मोठे वजन राखून आहे. चेहरा समोर नसला तरी सिस्टिम थांबलेली नाही, मात्र ती आता अत्यंत गुपित पद्धतीने काम करत असल्याचे दिसून येते.
( नक्की वाचा : Court Verdict : खाकीला फाशीचा डाग! बाप-लेकाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा, काय आहे प्रकरण? )
रहस्यमयी कोम शहर
इराणमधील कोम हे केवळ धार्मिक शहर नसून ते आता सत्तेच्या सस्पेंसचे केंद्र बनले आहे. मोजतबा खामेनी यांच्यावर याच शहरात उपचार का केले जात आहेत, यामागे काही मोठी कारणे सांगितली जात आहेत. येथे सर्वोच्च धर्मगुरुंची उपस्थिती असते आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग अत्यंत सुरक्षित मानला जातो.
मात्र, तिथे अली खामेनी यांच्यासाठी बांधल्या जाणाऱ्या मकबऱ्यात एकापेक्षा जास्त कबरींची जागा ठेवण्यात आली आहे. या एका गोष्टीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून, इराणमध्ये काहीतरी मोठे घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एआय व्हिडिओचा आधार आणि इराणची रणनीती
मोजतबा खामेनी यांचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला होता, मात्र तो एआय (AI) द्वारे तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. जनतेला नेतृत्व सक्रिय असल्याचे दाखवण्यासाठी हा प्रोपेगंडा वापरला गेल्याचे तज्ज्ञ म्हणतात. मात्र, यामुळे इराणच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इराणने आतापर्यंत केवळ मोजतबा जखमी असल्याचे मान्य केले आहे, पण सर्वोच्च नेते बनल्यापासून त्यांनी एकदाही लाईव्ह व्हिडिओ किंवा सार्वजनिक भाषण केलेले नाही.
नेतृत्व बदलाचे संकेत आणि पुढील आव्हाने
इराणमध्ये सर्वोच्च नेत्याचे पद हे आजीवन असते, परंतु नेता काम करण्यास सक्षम नसेल, तर नवीन नेता निवडण्याचा अधिकार धार्मिक परिषदेला आहे. त्यामुळे आता मोजतबा यांच्या जागी दुसऱ्या कुणाची निवड होणार का, हा मोठा प्रश्न आहे. येणारे 15 दिवस इराणसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर या काळात मोजतबा समोर आले नाहीत, तर इराणमध्ये सत्तांतराची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते. 40 दिवसांपासून दफन असलेले हे रहस्य आता जगासमोर कधी येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.