Iran Israel war effect on Maharashtra : इराण विरुद्ध इस्रायल युद्धाचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील धातूंवर आधारित फाऊंड्री उद्योगांसाठी कच्चा माल महाग झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या फळांचंही मोठं नुकसान होतंय. केळी, द्राक्षांचे अनेक कंटेनर्स अडकून पडलेत. युद्ध कधी थांबणार आणि आमचा माल आखातात कधी पोहोचणार याची सांगली, जळगाव, इंदापूर, नाशिकमधले शेतकरी वाट पाहत आहेत. हा माल इथेच अडकून पडला तर महाराष्ट्रातली अख्खी अर्थव्यवस्थाच कोलमडण्याची भीती आहे.
युद्धाचा महाराष्ट्रावर गंभीर परिणाम...
इराण इस्रायल युद्धाचे महाराष्ट्रावर अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत. महाराष्ट्राचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान या युद्धामुळे झालं आहे. फळांची निर्यात ठप्प झाली, तर उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल महागलाय. इराण इस्रायल युद्धाचा फाऊंड्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे. पेट्रोलच्या एका बॅरलमध्ये 65 डॉलर वरून 85 डॉलर एवढी दरवाढ झाली आहे. ही वाढ येणाऱ्या काळात दीडशे डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ऑइल आणि गॅस व्हॉल्वचा जगभरात पुरवठा करणाऱ्या कंपन्याना याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
निर्यातदारांचं गणितच कोलमडलंय
दुसरीकडे इराण इस्रायल युद्धामुळे निर्यातदारांसमोर नवं संकट उभं राहिलंय. शिपिंग कंपन्यांनी WRS म्हणजे युद्धाचा अधिभार लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे निर्यातीत प्रत्येक कंटेनरमागे तीन ते साडेतीन लाखांचा खर्च वाढणार आहे. भारतातून हजारो कंटेनर परदेशी बाजारपेठेत जाण्याच्या प्रतीक्षेत असतानाच आता नवा आर्थिक भार सोसावा लागणार आहे. फळांचे कंटेनर परदेशी पाठवण्यासाठी प्रत्येक शिपिंग कंपन्यांचे वेगवेगळे दर असतात. सध्या 3 हजार ते साडेतीन हजार डॉलर म्हणजे कंटेनरमागे तीन ते साडे तीन लाखांपर्यंत हे दर आहेत. साधारणपणे 13 टन क्षमतेचा एक कंटेनर आखातात पाठवण्यासाठी 17 ते 18 लाख रुपये खर्च येतो. मात्र WRS मुळे प्रत्येक कंटेनरमागे तीन ते साडेतीन लाखांचा खर्च अधिकचा वाढणार आहे. सध्या एअरलाईन्सनीही हे दर वाढवलेत. एका किलोमागे 80 रुपये आकारले जात होते. तिथे आता 250 रुपयांपर्यंत पैसे आकारले जात आहेत. भारतातून शेतमाल, द्राक्ष, कांदे आणि इतर शेतमाल आखातात पाठवणाऱ्या निर्यातदारांचं गणितच कोलमडलंय.
दाक्षांचे दर कोसळणार, जेएनपीटी बंदरावर केळ्यांचे कंटेनर्स अडकून
जळगावातून आखातात केळीची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. जळगाव जिल्ह्यातली केळी युद्धामुळे भारतातच अडकून पडली आहेत. जेएनपीटी बंदरावर जळगावच्या केळ्यांचे शंभर पेक्षा जास्त कंटेनर्स अडकलेत. रमजान महिन्यात आखाती देशात केळ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. निर्यात रखडल्याने केळीचे भावही घसरण्याची भीती आहे. जळगावच्या केळ्यांप्रमाणेच नाशिकमधली द्राक्षंही अडकून पडली आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसतोय. रमजानच्या काळात आखाती देशांत द्राक्षांनाही मोठी मागणी असते. मात्र दुसरीकडे भारतात हजारो कंटेनर परदेशी बाजारपेठेत जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. वाहतूक खर्च वाढलाय, माल खराब होण्याची भीती आहे. माल निर्यात होत नसल्याने भारतात द्राक्षांचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळण्याची भीती आहे. गेल्या वर्षी जवळपास सहा महिने पाऊस झाल्याने द्राक्षांच्या उत्पादनात घट झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी आधीच संकटात आहे. उरलेल्या द्राक्षांना चांगला भाव मिळेल अशी आशा असतानाच युद्धामुळे हे नवं संकट कोसळलंय.
नाशिकप्रमाणेच इंदापूर आणि सांगलीमधून मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात केली जाते. इंदापूर तालुक्यातून द्राक्षांची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. इंदापुरातून सौदी अरेबिया, दुबईमध्ये द्राक्षांची निर्यात होते. सांगलीतून तब्बल साडेतीनशे कंटेनर द्राक्ष सध्या सांगलीच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून आहेत. तर 700 हून अधिक कंटेनर्स द्राक्ष बागेत तयार आहेत. त्याच बरोबर मुंबईच्या बंदरात 300 कंटेनर थांबून आहेत. त्यामुळे सांगलीतून जवळपास 15 हजार टन द्राक्षं आखाती देशात जाण्याची वाट पाहत आहेत. या सगळ्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झालेत. आता निर्यात कशी करायची, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.