जाहिरात

Dubai News : दुबईला सर्वात पहिला अन् मोठा धक्का! 'सेफ हेवन' मॉडेल क्षणात कसं झालं उद्ध्वस्त?

आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि श्रीमंत परदेशी नागरिक दुबईत जायचं का, दुबईत घर घ्यायचं का आणि दुबईत राहायचं का, हे पुन्हा तपासून पाहतील, अशी स्थिती आहे.

Dubai News : दुबईला सर्वात पहिला अन् मोठा धक्का! 'सेफ हेवन' मॉडेल क्षणात कसं झालं उद्ध्वस्त?
प्रतिकात्मक फोटो

Effect of war on tourism in Dubai : आखात तसं सतत अस्वस्थ असतं. पण त्याला अपवाद असतो तो दुबईचा. दुबईत कधीही गोळीबार होत नाही, असा लौकिक ही दुबई मिरवते. सर्वात सुरक्षित आणि शांत स्वर्ग असंही दुबईला म्हटलं जातं. आता मात्र या सगळ्याला तडा गेलाय. इराणनं दुबईला लक्ष्य केलं. दुबईवर हल्ले केले आणि दुबईच्या या स्वर्गाला आयुष्यातला पहिला धक्का बसला. दुबईमध्ये एकूण जेवढे लोक राहतात, त्यापैकी तब्बल ३८ टक्के लोक भारतीय आहेत.  आता हे युद्ध जास्त काळ चाललं तर दुबईत नोकरी करायची का, दुबईत राहायचं का, याचा विचार अनेक भारतीय कुटुंबांनी सुरू केलाय. इराणच्या हल्ल्यांमुळे दुबईचं सेफ मॉडेल कसं कोलमडलंय. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

दुबईचं सेफ हेवनचं मॉडेल एका क्षणात उद्ध्वस्त... 

दुबईचं वर्णन केलं जातं ते म्हणजे या जगातला सेफ हेवन. म्हणजे सगळ्यात सुरक्षित स्वर्ग. जगभरातल्या श्रीमंतांचे या दुबईमध्ये मोठे मोठे महाल आहेत. पण इराणनं दुबईमध्ये मिसाईल्स डागली आणि सेफ हेवनचं हे मॉडेल एका क्षणात उद्ध्वस्त झालं. दुबईला बसलेला हा पहिला धक्का. दुबई म्हणजे पश्चिम आशियातलं एक सुरक्षित, स्थिर व्यावसायिक केंद्र. अनेक देशांतून नागरिक दुबईत आले आणि तिथं वर्षानुवर्षं स्थायिक झाले. इराणनं दुबईला लक्ष्य केलं. दुबईतल्या अमेरिकन दुतावासाला लक्ष्य केलं. हे फक्त अमेरिकन दुतावासाचं, इमारतींचं नुकसान नव्हे तर जगभरातून दुबईत येणाऱ्या गुंतवणूकदारांना, दुबईत स्थायिक झालेल्या नोकरदारांना आणि रहिवाशांना हादरवणारा हा धक्का आहे. दुबईतले एअरपोर्ट, बंदरं, हॉटेल आणि डेटा सेंटर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर पहिल्यांदाच हल्ले करण्यात आले. दुबईसाठी हा सर्वात मोठा आर्थिक–रणनीतिक कसोटीचा काळ आहे.

नक्की वाचा - Khamenei Death: आधी सिगारेट शिलगावली, आता चिअर्स; सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर इराणी तरुणी इतक्या आनंदी का? 

दुबईचं हे ‘सेफ-हब मॉडेल' आणि दुबईचा आर्थिक डोलारा हा स्थिरता आणि सुरक्षेवर आधारलेला आहे. पण इराणच्या हल्ल्यानंतर दुबईची ही प्रतिमा धुळीला मिळाली. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळ बंद राहिला. जेबेल अली पोर्ट आणि काही पर्यटन क्षेत्रांना आग लागली. अॅमेझॉनसारख्या क्लाउड डेटासेंटरवरही परिणाम झाला. इथे कधीच गोळीबार होत नाही, असं दुबई मिरवते. त्याला धक्का बसला. या हल्ल्यांनंतर UAE चे स्टॉक मार्केट दोन दिवस बंद राहिलं आणि उघडल्यावर शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. दुबईचा बेंचमार्क इंडेक्स जवळपास 5% घसरला. अबू धाबी इंडेक्स 3% पेक्षा जास्त खाली आला. त्यापाठोपाठ रिअल इस्टेट आणि बँकिंग क्षेत्रावरही याचा परिणाम झाला 

दुबईच्या पर्यटनावर परिणाम होण्याची भीती....

दुबईतली ही परिस्थिती पाहता आणि हे युद्ध बराच काळ चाललं तर आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि श्रीमंत परदेशी नागरिक दुबईत जायचं का, दुबईत घर घ्यायचं का आणि दुबईत राहायचं का, हे पुन्हा तपासून पाहतील, अशी स्थिती आहे. कदाचित काही कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी होऊ शकते. रिअल इस्टेटमधल्या नव्या प्रकल्पांना ब्रेक लागू शकतो. तेल उद्योग, पर्यटन आणि विमान वाहतूक हा दुबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. 

दुबई हे जगातलं लोकप्रिय पर्यटन स्थळ. दरवर्षी २ कोटी पर्यटक दुबईला भेट देतात. बुर्ज खलिफा, पाम जुमेराह, दुबई मॉल, डेझर्ट सफारी, स्कायडायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्स, शॉपिंग आणि नाईटलाइफ, दुबई शॉपिंग फेस्टिवल, आलिशान हॉटेल्स ही दुबईतली पर्यटकांसाठीची आकर्षणं. नोव्हेंबर ते मार्च हा काळ दुबई पर्यटनासाठी उत्तम मानला जातो. या हल्ल्यामुळे सर्वाधिक परिणाम दुबईतल्या पर्य़टनावर झाला. हल्ल्यानंतर हजारो विमान उड्डाणं रद्द झाली. 20,000 पेक्षा जास्त प्रवासी दुबई–अबू धाबीमध्ये अडकले. हजारो हॉटेल बुकिंग्स रद्द करण्यात आली. जर हा संघर्ष आणखी चिघळसा तर दुबईतलं कॉन्फरन्स, इव्हेंट आणि कॉर्पोरेट ट्रॅव्हल थांबेल.  पर्यटन महसुलात प्रचंड मोठी घट होईल. या सगळ्याचा आर्थिक फटका विमान कंपन्यांनाही बसेल. 


विशेष म्हणजे दुबईतली 90% लोकसंख्या परदेशी आहे. दुबईत पहिल्यांदाच रहिवाशांनी मिसाईल हल्ले, मिसाईल हल्ल्याचे कानठळ्या बसवणारे आवाज, आकाशातल्या ज्वाळा, बंकरमध्ये लपणं हे सगळं अनुभवलं आहे. आणि शांत, सुरक्षित दुबईच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. भारतीयांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दुबईमध्ये एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के भारतीय आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या लोकांचाही समावेश आहे. दुबईत बांधकाम, वित्त, आरोग्यसेवा आणि व्यापारामध्ये मराठी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसाय करत आहेत. तर दरवर्षी हजारो भारतीय पर्यटक दुबईला भेट देतात. युद्ध लवकर थांबलं तर दुबईची अर्थव्यवस्था पुन्हा वेगाने उभी राहील. ब्रँड इमेज हळूहळू सुधारेल. मात्र सेफ मॉडेल हा विश्वास पुन्हा प्रस्थापित करायला मात्र अजून बराच वेळ लागेल..


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com