Iran-US War: जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापारी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुजच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) अमेरिका आणि इराणच्या नौदलामध्ये भीषण संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केल्याचा दावा केला असून, यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा भडकली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांमध्ये युद्धविराम स्थिती असताना ही घटना घडली आहे.
काय घडले होर्मुजमध्ये?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे तीन 'डिस्ट्रॉयर' होर्मुजमधून जात असताना इराणने त्यांच्यावर गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केली की, "आमच्या युद्धनौकांवर डागलेली इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. इराणच्या अनेक लहान नौकाही पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत."
अमेरिकन नौदलाच्या तिन्ही युद्धनौका सुरक्षितपणे बाहेर पडल्या असून त्यांना कोणतेही नुकसान झालेले नाही, असाही दावा ट्रम्प यांनी केला आहे.
(नक्की वाचा- Pandharpur-Tirupati Train: विठूरायाची पंढरी तिरुपतीशी जोडली! 16 मेपासून नियमित रेल्वे धावणार, वाचा टाईमटेबल)
इराणचा दावा, अमेरिकेचे मोठे नुकसान
दुसरीकडे, इराणच्या 'इराणियन रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC)** ने अमेरिकेचा दावा फेटाळून लावला आहे. अमेरिकेने दक्षिण इराणमधील जास्क बंदराजवळ इराणच्या तेलवाहू जहाजाला लक्ष्य केल्याचा आरोप इराणने केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने अँटी-शिप बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनचा वापर करून अमेरिकन जहाजांवर मोठा हल्ला केला. इराणच्या मते, अमेरिकन जहाजांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना माघार घ्यावी लागली.
इराणमधील बंदर अब्बास, केशम बेट आणि राजधानी तेहरानजवळ मोठे स्फोट झाल्याचे वृत्त इराणच्या 'फार्स' न्यूज एजन्सीने दिले आहे.
(नक्की वाचा- IPL 2026: हार्दिक पांड्या MI च्या ताफ्यातून गायब! RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईची धाकधूक वाढली)
ट्रम्प यांचा इशारा
या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले, "इराण हा सामान्य देश नाही, तिथल्या नेतृत्वात मूर्ख लोकांचा भरणा आहे. जर त्यांना संधी मिळाली, तर ते अण्वस्त्रांचा वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत. पण आम्ही त्यांना कधीही अण्वस्त्रे मिळवू देणार नाही."
ट्रम्प यांनी पुढे इशारा दिला की, जर इराणने लवकरच कोणताही ठोस करार केला नाही, तर त्यांना भविष्यात यापेक्षाही भयानक आणि हिंसक कारवाईला सामोरे जावे लागेल.