US vs Iran War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगाची धास्ती वाढवली आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपण्याच्या मार्गावर असताना ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा येथे सुरू असलेल्या नाटो (NATO) शिखर परिषदेत बोलताना अमेरिकेचे ट्रम्प यांनी, "इराणसोबतचा तात्पुरता संघर्षविराम आता संपला आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे", असं म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी तेहरानमधील इस्लामिक सरकारचा उल्लेख 'रोगट विचारसरणीचे लोक' असा केला आहे. या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, जागतिक घबराटीमुळे भारतीय शेअर बाजारात चौफेर विक्री झाली. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी जोरात आपटले आहेत.
अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचे चोख प्रत्युत्तर
स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या कथित हल्ल्याचा सूड घेण्यासाठी 'यूएस सेंट्रल कमांड'ने इराणच्या एअर डिफेंन्स सिस्टीम, रडार आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या 60 हून अधिक नौकांवर बॉम्बवर्षाव केला होता.
(नक्की वाचा- Nitin Gadkari: ना पेट्रोल, ना डिझेल, ना CNG, आता कचऱ्यावर धावणार बस! इथेनॉलनंतर नितीन गडकरींची मोठी घोषणा)
या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरिन आणि कुवैतमध्ये असलेल्या अमेरिकन आर्मीच्या तब्बल 85 लष्करी तळांवर मिसाइल आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ला चढवला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच हा हिंसाचार घडल्याने शांततेच्या वाटाघाटी पूर्णपणे फिस्कटल्याची चर्चा सुरु झाली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालीबाफ यांनी स्पष्ट केले आहे की, "आम्ही अमेरिकेच्या धमक्यांसमोर झुकणार नाही."
कच्च्या तेलाच्या किमती 5% हून अधिक भडकल्या
ट्रम्प यांच्या युद्धविराम संपल्याच्या वक्तव्यानंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. ब्रेंट क्रूड 5.3 टक्क्यांनी वाढून 78.09 प्रति बॅरलवर पोहोचले. तर डब्ल्यूटीआय क्रूड 5.4 टक्क्यांच्या उसळीसह 74.23 प्रति बॅरलवर व्यापार करत आहे.
(नक्की वाचा- Dombivli News: शिंदे गटाच्या नगरसेवकाची गुंडगिरी; महिला डॉक्टर आणि नर्सना रुग्णालयात घुसून मारहाण)
भारतीय शेअर बाजार आपटला
जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आणि युद्धाच्या भीतीमुळे भारतीय गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली. दुपारच्या सत्रात बाजारात मोठी घसरण झाली. सेंसेक्स दुपारी 2.50 वाजेपर्यंत 2.43% घसरणीसह 76,283.17 अंकांच्या पातळीवर खाली आला. तर निफ्टी 50 देखील 2.41% घसरून 23,809.85 वर खाली आला.