US-Iran War Update: गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाने आता अतिशय धोकादायक वळण घेतले आहे. इराणच्या हवाई संरक्षण दलाने अमेरिकेचे F-15E स्ट्राईक ईगल हे लढाऊ विमान पाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या विमानात दोन पायलट होते. ज्यापैकी एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे, मात्र दुसरा वैमानिक अद्याप बेपत्ता असून तो इराणच्या दक्षिण-पश्चिम भागात असल्याचे समजते.
अमेरिकेची कबुली आणि थरारक बचाव मोहीम
सुरुवातीला या घटनेवर मौन बाळगणाऱ्या अमेरिकेने अखेर विमान कोसळल्याचे मान्य केले आहे. अमेरिकन विशेष दलाने दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने एका वैमानिकाला सुरक्षित बाहेर काढले. या मोहिमेदरम्यान हेलिकॉप्टरवर इराणकडून गोळीबारही झाला, ज्यात काही सैनिक जखमी झाले आहेत. दुसरा सदस्य, जो 'वेपन सिस्टम ऑफिसर' (WSO) असल्याचे सांगितले जात आहे, तो इराणच्या कोहगिलुयेह आणि बोयर-अहमद प्रांतात पॅराशूटच्या सहाय्याने उतरल्याचा अंदाज आहे.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! पावसाळ्यापूर्वी 'हे' पूल होणार खुले; BMC कडून डेडलाईन जाहीर)
इराणकडून बक्षीस आणि 'शिकार' सुरू
इराणच्या सरकारी टेलिव्हिजनवर (IRIB) अँकरने स्थानिक रहिवाशांना आवाहन केले आहे की, जर कोणी या अमेरिकन वैमानिकाला जिवंत पकडून लष्कराच्या ताब्यात दिले, तर त्याला 60,000 डॉलर्स (सुमारे 10 अब्ज इराणी तोमान) चे 'मौल्यवान बक्षीस' दिले जाईल. यामुळे स्थानिक या वैमानिकाचा शोध घेत असून, अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. "आम्हाला आशा आहे की आमच्या वैमानिकाशी वाईट वर्तन केले जाणार नाही," असे सांगत त्यांनी पुढील लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. जर इराणने वैमानिकाला ओलीस धरले, तर अमेरिका इराणवर आणखी मोठे हल्ले करू शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
F-35 पाडल्याचाही दावा
दरम्यान, इराणच्या 'तस्नीम न्यूज एजन्सी' ने दावा केला आहे की त्यांनी अमेरिकेचे आणखी एक प्रगत F-35 स्टील्थ फायटर विमान मध्य इराणमध्ये पाडले आहे. याचे काही ढिगारे दाखवणारे फोटोही त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. मात्र, अमेरिकेने अद्याप F-35 बाबतच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.