Los Angeles : लॉस एंजेलिस पोलिसांनी भर रस्त्यावर एका 36 वर्षांच्या शीख व्यक्तीवर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. लॉस एंजेलिस पोलिस विभागाने प्रसिद्ध केलेल्या फुटेजनुसार, गुरप्रीत सिंह शीखांची पारंपारिक मार्शल आर्ट 'गतका' करत होता. पोलिसांनी सांगितले की, तो लॉस एंजेलिस शहरातील क्रिप्टो.कॉम अरेनाजवळ एक शस्त्र घेऊन फिरत होता. त्याने पोलिसांची सूचना ऐकली नाही. तसंच पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला गोळ्या घालण्यात आला. त्याच्याकडे 'खंडा' हे शस्त्र असल्याचं आढळलं. हे भारतीय मार्शल आर्टमध्ये वापरले जाणारे दुधारी तलावारीसारखे शस्त्र आहे.
ही घटना 13 जुलै रोजी घडली. लॉस एंजेलिसमधील फिगेरोआ स्ट्रीट आणि ऑलिंपिक बुलेवार्डच्या वर्दळीच्या चौकात एक व्यक्ती मोठे पाते फिरवत असल्याबद्दलची माहिती तेथील स्थानिकांनी पोलिसांना फोन करुन कळवली होती.
( नक्की वाचा : US School Firing : अमेरिकेत पुन्हा गोळीबार, शाळेत घुसून केलेल्या गोळीबारात निष्पाप मुले लक्ष्य )
बाटली फेकली आणि...
पोलिसांनी असेही सांगितले की, गुरप्रीत सिंहने त्याचे वाहन रस्त्याच्यामध्येच सोडून दिले. त्याने एकदा स्वत:ची जीभ कापण्याचाही प्रयत्न केला. आम्ही त्याला शस्त्र खाली ठेवण्याचा आदेश दिला होता, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या अधिकाऱ्यानं पुढं सांगितलं की, पोलिस त्याच्याजवळ पोहोचले तेव्हा त्याने त्यांच्यावर एक बाटली फेकली आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्याचा पाठलाग करत होते आणि तो वेड्यासारखे वाहन चालवत होता. अखेरीस, दुसऱ्या पोलीस वाहनाशी टक्कर झाल्यानंतर तो फिगेरोआ आणि 12 व्या स्ट्रीटजवळ थांबला. त्यानंतर त्याने पोलिसांवर चाकूने हल्ला केला, ज्यानंतर त्याला गोळ्या घालण्यात आल्या.
घटनास्थळावरून 2 फूट लांबीचा एक चाकू जप्त करण्यात आला असून तो पुरावा म्हणून नोंदविण्यात आला आहे. गुरुप्रीतला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेत कोणत्याही अधिकारी किंवा नागरिकाला कोणतीही दुखापत झालेली नाही. या गोळीबाराची सध्या चौकशी करण्यात येत आहे.